

मुंबई : हृदयाची पंपिंग क्षमता कमी झालेल्या आणि हृदयाचे ठोके अनियमित होण्याचा गंभीर त्रास असलेल्या रुग्णांना जे. जे. रुग्णालयात महागडे उपचार मोफत मिळत आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत गेल्या ७ महिन्यांत एकूण २५ रुग्णांवर हे यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनंतर आरोग्य विभागाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार सुधारित उपचार यादीत सीआरटी-डीचा समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत हे उपचार करण्यात येत आहेत.
रुग्णालयाच्या हृदयरोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक व युनिटप्रमुख डॉ. अनंत मुंडे यांनी सांगितले की,२ मार्च २०२६ पासून आतापर्यंत या दोन्ही उपचारपद्धतींच्या मिळून २५ प्रक्रिया करण्यात आल्या आहेत. खासगी रुग्णालयात सीआरटी-डी उपचारासाठी ११ ते १५ लाख रुपये खर्च येऊ शकतो.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना हा खर्च परवडणे कठीण जाते. जे. जे. रुग्णालयात पात्र रुग्णांना या योजनेंतर्गत उपचार मोफत मिळत असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २ मार्च रोजी जे. जे. रुग्णालयात योजनेंतर्गत सीआरटी-डीची पहिली प्रक्रिया करण्यात आली.
महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत अशा प्रकारची ही पहिली प्रक्रिया असल्याचा दावा डॉ. मुंडे यांनी केला. अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांच्या नेतृत्वाखाली हृदयरोग विभागाच्या पथकाने हे उपचार सुरू केले. उपचार मिळण्यासाठी पात्रतेची माहिती रुग्णालयातील आरोग्यमित्र किंवा योजना मदत कक्षातून घेता येईल.
सीआरटी-डी उपचार कशासाठी?
हृदयाच्या खालच्या दोन कप्प्यांचे आकुंचन योग्य समन्वयाने होत नसेल, तर सीआरटी-डी उपकरण हृदयाचे काम अधिक समन्वयाने होण्यास मदत करते. हृदयाचे ठोके जीवघेण्या पद्धतीने अनियमित झाल्यास हे उपकरण विद्युत धक्का देऊन ठोक्यांची लय पूर्ववत करण्याचाही प्रयत्न करते. औषधोपचार करूनही हृदयाची पंपिंग क्षमता कमी असलेल्या रुग्णांसाठी हा उपचार उपयुक्त ठरतो.
सीएसपीमुळे ठोक्यांचा समन्वय
कंडक्शन सिस्टीम पेसिंग या पद्धतीत हृदयाच्या नैसर्गिक विद्युत वहन यंत्रणेला चालना दिली जाते. हृदयाचे ठोके नियमित ठेवण्यासाठी पेसिंगची गरज असलेल्या काही रुग्णांमध्ये ही पद्धत वापरली जाते. योग्य रुग्णांमध्ये हृदयाच्या आकुंचनाचा समन्वय टिकवून ठेवण्यासही तिची मदत होऊ शकते. या दोन्ही उपचारपद्धती प्रत्येक हृदयविकाराच्या रुग्णासाठी आवश्यक नसतात. रुग्णाची प्रकृती, हृदयाची कार्यक्षमता आणि तपासण्यांचे निष्कर्ष पाहून तज्ज्ञ डॉक्टर उपचाराचा निर्णय घेतात.
उपचारानंतरही पाठपुरावा आवश्यक
उपकरण बसवल्यानंतर रुग्णांनी नियमित औषधे घेणे, वेळोवेळी उपकरणाची तपासणी करून घेणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाठपुरावा करणे गरजेचे आहे. हृदयाची पंपिंग क्षमता कमी असलेल्या किंवा पेसमेकरची गरज असल्याचे सांगण्यात आलेल्या रुग्णांनी जे. जे. रुग्णालयाच्या हृदयरोग विभागात तपासणी करून घ्यावी. योजनेंतर्गत उपचार मिळण्यासाठी पात्रतेची माहिती रुग्णालयातील आरोग्यमित्र किंवा योजना मदत कक्षातून घेता येईल.