

मुंबई : राज्यात स्वस्थ नारी सशक्त नारी अभियानात एक कोटी ५१ लाख १० हजार महिलांची तपासणी करण्यात आली असून १७ हजार ६१८ महिलांना मुख कर्करोगाचे निदान झाले. तर ४५० महिलांना स्तनाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे सर्वाधिक संशयीत रुग्ण नागपूर जिल्ह्यात ३,७४४, तर बुलढाणा जिल्ह्यात १२६९ आणि अमरावती जिल्ह्यात १४६० इतक्या महिला मुख आणि स्तन कर्करोगाने ग्रस्त असल्याचे समोर आले आहे.
राज्य सरकारने स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान संपूर्ण राज्यात राबवले असून या अभियानाद्वारे महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी सर्वत्र शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत केलेल्या आरोग्य तपासणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून अनेक महिला कर्करोग आणि ॲनिमियाने ग्रासल्याचे समोर आले आहे. तसेच मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या अनेक महिला शिकार झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. या महिलांच्या आरोग्याची काळजी घेत राज्य सरकारच्यावतीने उपचार दिले जात असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
१७,६१८ महिलांना मुख कर्करोग !
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येत असून कर्करोगासंदर्भात आतापर्यंत ३ लाख ३८ हजार २७९ ठिकाणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरांमध्ये एक कोटी ५१ लाख दहा हजार महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. यामध्ये १७,६१८ महिला मुख कर्करोगाच्या संशयित आढळल्या. सर्वाधिक संशयित रुग्ण नागपूर जिल्ह्यामध्ये ३७४४ तर बुलढाणा जिल्ह्यात १२६९ आणि अमरावती जिल्ह्यात १४६० इतके आढळले. या पाठोपाठ नाशिक जिल्ह्यामध्ये ५६५ महिला रुग्ण संशयीत आढळले असून त्यापैकी ४६ महिलांच्या बायोप्सी नमुने घेण्यात आले तर ३४ महिलांना कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले आहे. राज्यभरात एकूण बायोप्सी नमुने घेण्यात आलेल्या २३४९ महिलांपैकी ८४१ महिलांना मुख कर्करोग असल्याचे निदान झाले आहे.
450 महिलांना स्तन कर्करोग !
स्तनकर्करोगासाठी राज्यातील ८२ लाख ५१ हजार महिलांची तपासणी करण्यात आली. स्तन कर्करोगाच्या १२२८६ संशयित रुग्णांपैकी १४७० रुग्णांची बायोप्सी करण्यात आली यापैकी ४५० महिला स्तन कर्करोग ग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ३० महिला स्तनकर्करोग ग्रस्त असल्याचे समोर आले असून त्यापाठोपाठ सातारा २८ आणि सांगलीत २९ महिला स्तन कर्करोग पीडित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
साडेसहा लाखांहून अधिक महिला ॲनिमियाग्रस्त !
रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असलेल्या अर्थात अॅनिमिया ग्रस्त असलेल्या महिलांच्या आरोग्याची तपासणीसाठी ५५ लाख ८३ हजार महिलांची तपासणी करण्यात आली यापैकी ६ लाख ७१ हजार २९१ इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांना अॅनिमिया असल्याचे समोर आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक ७४००० महिला अॅनिमिया ग्रस्त आहेत. त्या पाठोपाठ पुणे नागपूर बुलढाणा अकोला नांदेड परभणी आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये अॅनिमिया ग्रस्त महिलांची आकडेवारी चिंताजनक आहे.
२३४ महिला गर्भाशयाच्या कर्करोगाने त्रस्त !
गर्भाशय कर्करोग तपासणीसाठी ५४ लाख ४७ हजार महिलांची तपासणी करण्यात आली. यापैकी दहा हजार महिला संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १७१० महिलांची बायोप्सी करण्यात आल्यानंतर २३४ महिलांना हा कर्करोग असल्याचे निदान करण्यात आले आहे. नागपूर, बुलढाणा, पुणे, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात गर्भाशयाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या महिला अधिक आढळल्या आहेत.