

मुंबई : मध्य रेल्वेच्या एका एक्स्प्रेस गाडीच्या एसी डब्यात एक महिला प्रवासी इलेक्ट्रॉनिक किटलीमध्ये मॅगी करतानाच्या व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ उडाली होती. प्रवाशांच्या बेदरकारपणामुळे रेल्वे प्रवासच किती धोकादायक ठरत आहे, अशा आशयाच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याची तातडीने दखल घेत मध्य रेल्वेने या महिला प्रवाशाविरोधात कारवाईचे पाऊल उचलले आहे. हा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याविरोधातही कारवाई करण्यात येणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.
या व्हिडीओमध्ये किटलीमध्ये मॅगी करणारी संबंधित महिला तिचे स्वयंपाकघर कुठेही सुरू आहे, असे विनोदाने म्हणत असल्याचे दिसते. तसेच मॅगीनंतर आता 15 लोकांसाठी चहाही बनवायचा आहे, असे सांगत असल्याचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. प्रवाशांच्या असुरक्षित वर्तनाबद्दल आणि रेल्वे सुविधांच्या गैरवापराकडेही यात लक्ष वेधण्यात आले. याची दखल घेत मध्य रेल्वेने कारवाईचे पाऊल उचलले. हा प्रकार असुरक्षित, बेकायदेशीर आणि दंडनीय गुन्हा आहे. यामुळे आगीच्या घटना घडू शकतात आणि इतर प्रवाशांसाठीही घातक ठरू शकतात. प्रवाशांना अशा कोणत्याही धोकादायक वर्तनापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.