

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना आणि आरक्षण सोडतीनंतर इच्छुकांकडून प्रभागांची नव्याने चाचपणी सुरू आहे. मात्र महायुती व महाआघाडीबाबत अद्याप कोणतीच ठोस भूमिका पक्ष नेतृत्वांनी न घेतल्याने सर्वच इच्छुक संभ्रमात आहेत.
अनेक इच्छुक उमेदवारांनी स्वत:ची वैयक्तीक ताकद दाखवण्याचा मार्ग स्वीकारला आहे. काही ठिकाणी महायुतीतील नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्ते महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय वाद निवडणुकीची चाहुल लागल्यापासूनच टोकला गेला आहे. एकेमेकांविरोधात बोलण्याची ते दोघ एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे नवी मुंबईत शिवसेना शिंदे गट व भाजप एकत्रीत निवडणुका लढणे अशक्य आहे. तसेच महाविकास आघाडीतही ताळमेळ दिसत नाही. उबाठा आणि मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. पण मुंबईतील काँग्रेसची स्वबळाची भूमिका आणि शरद पवार गटानेही अद्याप कोणतीच भूमिका न घेतल्याने सर्वच पक्षांतील इच्छुकांची मोठी पंचायत झाली आहे.
शरद पवार गटाची संदीप नाईकांना खुली ऑफर
माजी आमदार संदीप नाईक यांनी विधानसभा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढवली होती. अवघ्या 377 मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला. त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा सतत सुरू आहेत. मात्र त्यांचा अजून प्रवेश झालेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी त्यांना खुली ऑफर केली आहे. संदीप नाईक यांनी उमेदवार उभे करण्यासाठी पुढाकार घेतल्यास आपण त्यांचे स्वागतच करू, असे शिंदे यांनी वक्तव्य केले आहे.
भाजपचे कार्यकर्ते हे वांरवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळे महायुती होणे जवळपास अशक्यच आहे. आम्ही स्वबळावर 111 प्रभागांत इच्छुक उमेदवारांची तयारी करत आहे. वरिष्ठ आपल्या पातळीवर कोणाला तिकिट द्यायचे यांचा निर्णय घेतील.
किशोर पाटकर, जिल्हाअध्यक्ष शिंदे गट
भाजपमधील उमेदवारांमध्ये संभ्रम नाही. विधानसभा निवडणुकीत महायुतीमधील उमेदवारांच्या विरोधात शिवसेनेच्या पदाधिकांऱ्यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे पालिका निवडणुकीत युती करु नये, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कार्यकर्त्यांचे म्हणणे पक्षक्षेष्ठीपर्यत पोहचवण्यात येईल.
संजीव नाईक, भाजप नेते
नवी मुंबईमध्ये महाविकास आघाडी होणार असून त्यामध्ये मनसेचा देखील समावेश होणार आहे. महायुतीमधील देखील उमेदवार आमच्या संपर्कात आहेत. पण महाविकास आघाडीमधील जे इच्छूक पक्षांबरोबर राहिले त्यांना प्रथम प्राधन्य देण्यात येईल.
प्रविण म्हात्रे, जिल्हाअध्यक्ष, शिवसेना ठाकरे गट