

मुंबई : नाना प्रलोभने दाखवून हिंदूंसह अन्य धर्मियांना बाप्तिस्मा देत त्यांचे धर्मांतर घडवण्याचे ख्रिस्ती मिशनऱ्यांचे प्रताप नेहमीच चर्चेत येतात. मात्र चेंबूरमध्ये या मिशनऱ्यांनी आता कहरच केला आहे. चेंबूरच्या म्हैसूर कॉलनी स्मशानभूमीतील कालिमातेची मूर्ती या मंडळींनी बळकावली, मंदिरावर कब्जा केला आणि नवी रंगरंगोटी, मेकअप करून कालिमातेेचे रुपांतर चक्क मदर मेरीमध्ये करून टाकले.
ख्रिश्चनांची मदर मेरी हे त्यांच्या श्रद्धेचे दैवत असले तरी ही मदर मेरी नेहमीच लेकरू कडेवर घेऊन करुणामूर्ती म्हणूनच आजवर दिसत आली आहे. मैसूर कॉलनीच्या स्मशानभूमीतील कालिमातेची मूर्ती रंगवून तिला मदर मेरी करताना कालिमातेचा रूद्रावतार मिशनऱ्यांना काही लपवता आला नाही. जीभ बाहेर काढलेली ही रूद्र कालिमाता मदर मेरीच्या रूपातही जणू या मिशनऱ्यांकडेच संतप्त होऊन पाहात असावी.
गळ्यात मुंडमाळ, हातात रक्तबीज राक्षसाचा वध करून त्याचे रक्त ठेवलेला कलश, अशा या रूद्र कालिमातेच्या मूर्तीला मदर मेरीची वस्त्रे चढवून तिच्या हाती मिशनऱ्यांनी एक बाळाची मूर्तीही सोपवली. मागे लाल पडदा लावला, त्यावर क्रूस रंगवला, मेरीच्या डोक्यावर ख्रिस्ती पद्धतीचा मुकुट ठेवला. हे सारे करताना मिशनऱ्यांनी गाभारा बळकावला; मात्र या गाभाऱ्याच्या दरवाजावर असलेले ओम आणि स्वस्तिक तसेच ठेवले. गाभाऱ्यासमोर हळद-कुंकवाने माखलेले यज्ञकुंडही मिशनऱ्यांनी हलवलेले नाही. हळूहळू हे बदल त्यांना करावयाचे असावेत. मात्र त्यापूर्वीच कालिमातेच्या मूर्तीची मदर मेरी केल्याची बातमी पोलिसांपर्यंत पोहोचली. कुणीही अधिकृत तक्रार दिली नसतानाही आरसीएफ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी शनिवारी सकाळीच आणिक गाव स्मशानभूमीतील कालिमाता मंदिराला भेट दिली, मूर्तीमध्ये करण्यात आलेले बदल नोंद केले आणि हा अगोचरपणा करणाऱ्या अज्ञात मिशनऱ्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 223 कलम 299 अन्वय गुन्हा दाखल केला.
हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो. पोलिसांच्या सहकार्याने मदर मेरीचा केलेला पोशाख बदलून कालिमातेला महास्नान करून आरती केली. ख्रिश्चन मिशनरींनी धर्मांतरासाठी आता स्मशानभूमीही सोडली नाही. या सर्व प्रकाराच्या मुळापर्यंत जाणे गरजेचे असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे अमित जोशी म्हणाले.
आणिक गाव स्माशानभूमीतील कालिमाता मंदिराचा पुजारी रमेश पंडित याला अटक करण्यात आली असून दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कालिमाता स्वप्नात आली, म्हणाली, मला मदर मेरीसारखा शृंगार कर. त्यानुसार मी हा शृंगार केला, अशी कहाणी या पुजाऱ्याने ऐकवली.
पुजाऱ्याचे म्हणणे साफ खोटे आहे. हा सर्व प्रकार मिशनरीचा आहे. या परिसरात हिंदूंना प्रलोभने दाखवून ख्रिश्चन करण्याचा प्रकार होत आहे. हा प्रकारही यातूनच झाला आहे. पोलिसांनी चौकशी करून धर्मांतरासाठी प्रलोभने देणाऱ्या अदृश्य हातांना बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे दक्षिण मध्य मुंबई महामंत्री विशाल गुणेश्वर यांनी केली.