

प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखक प्रा. जयंत नारळीकर यांचे पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी आज (दि. २०) निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. पहाटे झोपेतच त्यांच्या प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने भारताने एक तेजस्वी वैज्ञानिक आणि विज्ञानसंस्कृतीचा पुरस्कर्ता गमावला आहे.
जयंत नारळीकर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ होते. केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी उच्च शिक्षण घेतले होते. टाटा मूलभूत संशोधन संस्थेत कार्यरत राहिल्यानंतर त्यांनी पुण्यात 'आयुका' (आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र व खगोलभौतिकी केंद्र) या संस्थेच्या स्थापनेत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या वैज्ञानिक योगदानाबरोबरच, ते आपल्या रसाळ आणि समजेल अशा भाषेतील मराठी विज्ञानकथांसाठीही ओळखले जात होते.विज्ञानाच्या क्षेत्रात भरीव कामगिरीसह साहित्यविश्वातही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. २०२१ साली नाशिक येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. त्यांच्या निधनामुळे विज्ञान, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉ. जयंत नारळीकर यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूरमध्ये झाला. वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे बनारस हिंदू विद्यापीठातील प्रसिद्ध गणिततज्ञ, तर आई सुमती नारळीकर या संस्कृतच्या शिक्षिका होत्या. बालपणापासूनच शैक्षणिक वातावरणात वाढलेल्या जयंत नारळीकर यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून सुरुवातीचे शिक्षण घेतले आणि उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे त्यांनी जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सिद्धांतामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती लाभली. "बिग बॅंग" थिअरीला विरोध करणाऱ्या या सिद्धांताने त्यावेळी खगोलशास्त्रात नवा दृष्टिकोन दिला.
१९७२ मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना देशसेवेच्या आवाहनासाठी भारतात बोलावले. टाटा मूलभूत संशोधन संस्थेत त्यांनी महत्त्वाचे कार्य केले आणि पुढे पुण्यात ‘आयुका’ (IUCAA – Inter-University Centre for Astronomy and Astrophysics) या संस्थेची स्थापना करून खगोलशास्त्राच्या संशोधनाला नवे दालन खुले केले. आधुनिक खगोलशास्त्राच्या पायाभरणीचे श्रेय त्यांनाच दिले जाते.
केवळ वैज्ञानिक संशोधनच नव्हे, तर विज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डॉ. नारळीकर यांनी मराठीतून विज्ञानकथा, कादंबऱ्या आणि ललित लेखनही केले. अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, टाइम मशीनची किमया, यक्षांची देणगी, वामन परत न आला, चला जाऊ अवकाश सफरीला यांसारख्या कथा आणि विज्ञानविषयक पुस्तकांनी त्यांनी विज्ञानाला मनोरंजक बनवले. चार नगरांतले माझे विश्व या आत्मचरित्रातून त्यांनी आपले प्रवास, चिंतन आणि अनुभव मांडले.
डॉ. नारळीकर यांना भारत सरकारकडून पद्मविभूषण (२००४), महाराष्ट्र भूषण (२०१०) आणि साहित्य अकादमी पुरस्कार (२०१४) यांसारख्या अनेक सन्मानांनी गौरवण्यात आले. विज्ञान आणि साहित्य या दोन विविध वाटांवर त्यांनी अचूक आणि संवेदनशील पावले टाकली. त्यांच्या जाण्याने विज्ञानप्रेमींना, संशोधकांना आणि वाचकांना मोठी पोकळी जाणवेल. मात्र त्यांचे कार्य आणि विचार हीच त्यांच्या स्मृतींची अमूल्य ठेव ठरणार आहे.
डॉ. जयंत नारळीकर यांचा 19 जुलै हा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘विज्ञानकथा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. नारळीकरांच्या ‘कृष्णविवर’ या कथेपासून मराठीतील विज्ञान कथेकडं गांभीर्यानं पाहिलं जाऊ लागलं. 1975 मध्ये झालेल्या साहित्य संमेलनात श्रीमती दुर्गा भागवत यांनी नारळीकरंच्या विज्ञान कथांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आणि तेथून मराठी विज्ञान कथा हे लक्षणीय दालन बनलं.
नाशिक येथील 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. जयंत नारळीकर यांनी भूषवले होते. विज्ञान कथा लिहिताना लेखकासमोर एक विशिष्ट हेतू असू शकेल. त्याला एखादी मनोवेधक वैज्ञानिक कल्पना वाचकांपर्यंत आणायची असेल; पण एखाद्या पाठ्यपुस्तकाच्या शैलीत नव्हे. उलट ती कल्पना गोष्टीरूपाने मांडता आली, तर वाचक ती सहजगत्या आत्मसात करू शकेल. एखादी कडू गोळी गिळायला त्रास होतो; पण ती साखरेच्या आवरणात रंगीबेरंगी करून दिली, तर सहजगत्या घशाखाली उतरते. हे उदाहरण देण्यामागे विज्ञानाला 'कुरूप', 'कडू' म्हणण्याचा उद्देश नाही, तर त्याकडे पाहण्याचा सामान्यांचा द़ृष्टिकोन कसा असतो, त्यावर भर देण्याचा आहे. 'पंचतंत्र' या ग्रंथात नीतीने जगण्यास आवश्यक असे शिक्षण रोचक कथांच्या माध्यमातून दिले आहे. त्याचप्रमाणे विज्ञानाशी फटकून वागणारा सामान्य वाचक विज्ञानकथा माध्यमातून विज्ञानाशी जवळीक साधू शकेल, असा विश्वास त्यांनी साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केला हाेता.