

Chhagan Bhujbal Minister Sworn |
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ दीर्घकाळानंतर मंत्रीपदी परतले. महायुती सरकारमधील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या मंत्रिपदी अखेर छगन भुजबळ यांची वर्णी लागली. आज (दि. २०) त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
महायुतीच्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या भुजबळ यांच्या पथ्यावर धनंजय मुंडे यांचा राजीनामा पडला आहे. भुजबळांची मंत्रिपदी वर्णी न लागल्याने ओबीसी समाज आणि समता परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते. त्यामुळे भुजबळ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण तत्कालीन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात विविध आरोपांना सामोरे जावे लागल्यानंतर राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हाच भुजबळांना पुन्हा मंत्रिपद मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती.
छगन भुजबळ यांची दीर्घ आणि बहुआयामी कारकीर्द राज्याच्या राजकारणात आहे. त्यांनी विविध राजकीय संलग्नता आणि अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. भुजबळांचा राजकीय प्रवास तळागाळातील पातळीपासून सुरू झाला, स्थानिक राजकारणातून पुढे राज्यस्तरीय नेतृत्वापर्यंत पोहोचला. भूजबळ येवला विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांनी १८ ऑक्टोबर १९९९ ते २३ डिसेंबर २००३ पर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गृहमंत्री म्हणूनही काम पाहिले.
छगन भुजबळ राज्याचे महत्त्वाचे नेते आहे. नगरसेवक ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी सरकारमध्ये यशस्वीपणे काम केलं आहे. नेत्यांनी छगन भुजबळ सारख्या महत्त्वाच्या आणि ओबीसी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याला मंत्रिमंडळात संधी दिली. भुजबळ राज्याच्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारत आहेत, याचा आनंद आहे. देवेंद्र फडणवीस सरकार आणखी मजबूत होईल आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी साजेस काम भुजबळ करतील, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.