

मुंबई: वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या दोन स्वतंत्र टोळ्यांचा महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) पर्दाफाश केला आहे. पुण्याच्या बाहेरील परिसरात किंग कोब्राचे सुमारे दोन लिटर संशयित विष जप्त करण्यात आले, तर नवी मुंबई व पनवेल परिसरात वाघ, बिबट्या व चित्त्यांची कातडी तसेच शिकारीसाठी वापरली जाणारी एअर रायफल हस्तगत करण्यात आली.
या दोन्ही कारवाईत ६ जणांना पकडण्यात आले असून, आरोपी व जप्त मुद्देमाल वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे.
डीआरआयने २५ नोव्हेंबर रोजी पुण्याच्या बाहेरील परिसरात कार्तिक पौर्णिमेच्या धार्मिक कार्यक्रमादरम्यान कारवाई केली. शेअर बाजारात ट्रेडिंग करणारा आणि नंतर सोशल मीडिया
इन्फ्लुएन्सर बनलेला एक व्यक्ती बेकायदा सर्पविषाचा व्यापार करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार संशयितावर पाळत ठेवण्यात आली. तो मध्यस्थ व संभाव्य ग्राहकाला भेटणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर डीआरआयच्या पथकाने इंद्रायणी नदी परिसरात कारवाई केली.
गर्दी आणि दुर्गम भूभागामुळे आव्हानात्मक परिस्थितीत अधिकाऱ्यांनी संशयितांचा पाठलाग करून तिघांना पकडले. त्यांच्या झडतीत दोन बाटल्यांमध्ये सुमारे दोन लिटर किंग कोब्राचे विष आढळले. कारवाईदरम्यान विष सांडल्याने डीआरआयचा एक अधिकारी जखमी झाला. जप्त विष व तिन्ही संशयितांना पुढील तपासासाठी महाराष्ट्र वन विभागाकडे सोपवण्यात आले.
दुसरी कारवाई २६ नोव्हेंबर रोजी नवी मुंबई परिसरात करण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून वन्यप्राण्यांच्या कातडीची विक्री करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार पनवेल परिसरात एका संशयिताला अडवून त्याच्या बॅगेची तपासणी केली असता वाघ आणि बिबट्याची असल्याचा संशय असलेली दोन कातडी आढळली.
या संशयितांकडे केलेल्या चौकशीनंतर नवी मुंबईतील एका निवासी संकुलात छापा टाकण्यात आला. तेथे दोन महिलांकडे चित्त्याची असल्याचा संशय असलेली कातडी व १७७ कॅलिबरची एअर रायफल आढळली. प्राथमिक तपासात बिबट्याच्या कातडीवर एअर रायफलच्या गोळीचा निशाणा असल्याचा संशय आहे. वाघ, बिबट्या आणि चित्त्याची प्रत्येकी एक कातडी, एअर रायफल आणि अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत तिघांना पकडण्यात आले.
किंग कोब्रा, वाघ, बिबट्या आणि चित्ता या प्रजाती वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ च्या अनुसूची-१ मध्ये समाविष्ट असून त्यांना सर्वोच्च कायदेशीर संरक्षण आहे. या प्राण्यांची शिकार, पकडणे, अनधिकृत ताबा आणि त्यांचे विष, कातडी अथवा अन्य अवयवांचा व्यापार प्रतिबंधित आहे. दोन्ही कारवाईमधील आरोपी आणि मुद्देमाल वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.