

मुंबई : मुंबईच्या औद्योगिक आणि सामाजिक पायाभरणीत मोलाचे योगदान देणारे, आद्य समाजसुधारक, शिक्षणाचे पुरस्कर्ते आणि ज्यांच्या पुढाकाराने बोरीबंदर ते ठाणे अशी पहिली रेल्वे धावली ते नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांचे नाव पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानकाला देण्याचा प्रस्ताव अनेक वर्षे केंद्र सरकारकडे धुळखात का पडला, असा संतप्त सवाल नानांचे वारसदार आणि नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट (९०) यांनी पुढारीशी बोलताना केला.
२०२१ मध्ये राज्य सरकारने दिलेला प्रस्ताव, पंतप्रधान, केंद्रिय गृहमंत्री, रेल्वे मंत्री यांना दिलेली निवेदने तसेच लोकप्रतिनिधींच्या शिफारशीनंतरही हा प्रस्ताव रखडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ३१ जुलै रोजी नानांची १५९ वी पुण्यतिथी आहे. तत्पूर्वी मुंबई सेंट्रल स्थानकाला 'नाना शंकरशेट टर्मिनल' असे नाव देण्याची घोषणा केंद्र सरकारने करावी, अशी मागणीही सुरेंद्र शंकरशेट यांनी केली.
नाना शंकरशेट हे आधुनिक भारतीय रेलवेचे जनक मानले जातात. आधुनिक मुंबईचे शिल्पकार देखील म्हणून ते ओळखले जातात. शिक्षण तज्ञ, समाजसुधारक असणाऱ्या नानांमुळे भारतात आणि पर्यायाने आशियात रेल्वे सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ते इंडियन रेल्वे असोसिएशनचे सदस्य होते. याच संस्थेमुळे इंग्रजांनी मुंबईत रेल्वे सुरू केली. भारतातील पहिल्या ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे म्हणजेच आताच्या मध्य रेल्वेच्या संचालकांपैकी ते एक होते. गिरगाव येथे नानांचा वाडा होता. रेल्वे टिकीट घरासाठी त्यांनी आपल्या वाड्याच्या मागील बाजूची जागा देऊन टाकली होती. मुंबईतील अनेक स्टेशनच्या उभारणीसाठी त्यांनी स्वतःची जमीन दान केली आणि निधीही दिला होता. त्यामुळेच पश्चिम रेल्वेवरील सर्वात महत्त्वाच्या स्टेशनचे म्हणजेच मुंबई सेंट्रलचे नाव बदलून 'नाना शंकरशेट टर्मिनल' करण्यात यावे, अशी मागणी पुढे आली आणि राज्य शासनानेही तसा ठराब पारित करून तो केंद्राकडे पाठवला. या प्रस्तावाला रेल्वे बोडनिही हिरवा कंदिल दिला आणि तो केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवला. त्यालाही आता दोन वर्षे उलटली. मात्र, निर्णय काही झालेला नाही.
मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना शंकरशेट यांचे नाव देण्यासाठी जगन्नाथ (नाना) शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, सरचिटणीस अॅड. मनमोहन चोणकर, सल्लागार प्रकाश चिखलीकर तसेच अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषद आणि मुंबईकरांनी मोठा लढा उभारला आहे. गेली पंचवीस वर्षे हा लढा सुरु आहे. मुंबई सेंट्रल स्थानकाच्या नामांतरासाठी शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक अॅड. मनमोहन चोणकर यांनी १४ जुलै २०११ रोजी मुंबई महानगरपालिकेत ठरावाची सूचना मांडली होती. हा ठराव त्यावेळी मंजूर करण्यात आला होता.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ मार्च २०२० रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पश्चिम उपनगरीय रेल्वेमार्गावरील मुंबई सेंट्रल टर्मिनसला 'नाना शंकरशेट' यांचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला. तसेच विधानसभेतही हा ठराव एकमताने मंजूर करून तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश कलमाडीपासून पियुष गोयल, अश्विनी वैष्णव, रावसाहेब दानवे यांना निवेदनही देण्यात आली. विविध पक्षांच्या नेत्यांनी शिफारशीही केल्या. मात्र त्याचा काहीच उपयोग झालेला नाही.
महाविकास आघाडी सरकारनंतर सत्तेवर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून नामांतरासाठी शिफारस केली. पाठपुरावा म्हणून मुख्य सचिवांनी केंद्रिय गृह विभागाच्या सचिवांना पत्रे लिहीली. परंतु, त्या पत्राकडेही दर्लक्ष करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेट यांचे नाव देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाची कोणतीच हरकत नाही, असे पत्र देत रेल्वे बोडनि केंद्रिय गृह मंत्रालयाचे लक्ष वेधले आहे. गृहविभागाने मात्र, अजूनही मुंबई सेंट्रल टर्मिनलच्या नामांतराच्या प्रस्तावाला हिरवा कंदिल दाखवलेला नाही, अशी खंत सुरेंद्र शंकरशेट यांनी व्यक्त केली. केंद्राच्या गृह मंत्रालयाने ३१ जुलैपूर्वी 'नाना शंकरशेट टर्मिनल' ची घोषणा करावी. आयुष्यातील उतारवयात सरकारने आपली ही अंतिम इच्छा पूर्ण करावी, असे भावनिक आवाहन सुरेंद्र शंकरशेट यांनी केले.
राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात आणखी सात-आठ स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव मंजूर केला. मात्र, मुंबई सेंट्रल नाना शंकरशेट टर्मिनसचा प्रस्ताव दिल्लीत का पडून आहे याचे उत्तर माझ्यासारख्याला मिळत नाही.
- सुरेंद्र शंकरशेट