

Narayan Rane on Prakash Mahajan Maharashtra Politics
दिल्ली : संपलेल्या माणसांवर मी बोलणार नाही. मला त्यांच्या कुठल्याच प्रश्नाला उत्तर द्यायचे नाही. संपलेल्या माणसांना मला संजीवनी द्यायची नाही. त्यांच्यात काय दम आहे, ते मी पाहिले आहे, ते ठाकरे यांच्या यांची बाजू लावून धरतात की नाही, हे मला माहीत नाही. महाजन यांना कोण कशाला मारेल. त्यांना मारून कोण ३०२ अंगावर घेईल, असा टोला माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते नारायण राणे यांनी मनसे नेते प्रकाश महाजन यांना लगावला. ते दिल्लीत आज (दि.१०) पत्रकारांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा राज्याच्या राजकिय वर्तुळात सुरू आहे. यावर राणे म्हणाले की, मी त्यांना अनेक वर्ष ओळखत आहे. ते दोघे एकत्र येऊ द्या, त्यांना चांगले नांदू द्या, लोकांना बंधू प्रेम दाखवून द्या. ते दोघे एकत्र आले तरी राजकारणात काही फरक पडणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका समोर असल्याने त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसरे काहीही नाही. याबाबत मी राज ठाकरे यांना काहीही सल्ला देऊ शकत नाही. ते परिपक्व राजकारणी आहेत. त्यांना सगळे समजते. दोघे भाऊ किती दिवस एकत्र राहतील, या प्रश्नावर नो कॉमेंट करत त्यावर पत्रकार विश्लेषण करतील, असे राणे यांनी सांगितले.
मुंब्रा रेल्वे अपघातावर ते म्हणाले की, अपघात हा कोणी करत नाही. तो होतो, असे माझे मत आहे. चौकशीनंतर अपघाताचे नेमके कारण समोर येऊ द्या. त्यानंतर सरकार आणि रेल्वे विभाग दोषींवर कारवाई करेल. यापूर्वी काही अपघात झाले नाही असे नाही. आता काही लोक बोलू लागले आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे आंदोलन करत आहेत. यांनी काहीही केले तरी यांना लोक निवडून देणार नाहीत.
काँग्रेसच्या राजवटीत असे अनेक अपघात झाले आहेत. तेव्हा किती लोकांनी राजीनामे दिले? रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी चांगले काम केले आहे. ते एक चांगला माणूस आहेत. मुंबईची लोकसंख्या जास्त आहे. रेल्वेचे दर माफक आहेत. तरी सुविधा दिल्या जातात. कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे यांचे तिकीट दर पहा आणि सेवा कशी दिली जाते ते पहा. अधिकच्या सुविधा दिल्या पाहिजेत, यावर आम्ही सहमत आहोत.
भाजपचे 125 आमदार आहेत. आणि वेटींग वर 15 आहेत. ते कोणत्या पक्षाचे आहेत, ते सांगायचे नाही. आमचे राज्यात व्यवस्थित सुरू आहे. आमचा नांदा सौख्य भरे सुरू आहे. त्यामुळे स्वबळावर राज्यात सत्ता स्थापन करण्याचा काहीही विषय नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले.