उदय सामंत आमचे सल्लागार नाहीत : खा. नारायण राणे

Narayan Rane: आमच्या परवानगीशिवाय महायुतीत कुणालाही प्रवेश नाही
Narayan Rane statement
खा. नारायण राणेpudhari photo
Published on
Updated on

कणकवली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सिंधुदुर्ग दौर्‍याच्या निमित्त प्रसार माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आ. नीलेश राणे हे माजी आमदार वैभव नाईक यांचा प्रवेश घेतील, असे वक्तव्य केले होते. याविषयी खा.नारायण राणे यांना विचारणा केली असता उदय सामंत आमचे सल्लागार नाहीत. सिंधुदुर्गात आमच्या परवानगीशिवाय कुणालाही महायुतीत प्रवेश मिळणार नाही, असा सज्जड इशारा खा.राणे यांनी दिला.

या पत्रकार परिषदेत बोलताना खासदार राणे यांनी माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “सिंधुदुर्गला बॅ. नाथ पै आणि मधु दंडवते यांनी खूप काही दिले, मात्र राऊत आणि नाईक यांनी सिंधुदुर्गसाठी काय केले?” राणे यांनी असा सवाल विचारून दोघांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उभे केले.

राणे पुढे म्हणाले की, “आमच्या कुटुंबावर आरोप करण्यापूर्वी त्यांनी स्वतःचे अस्तित्व तपासावे. बदली, प्रमोशन आणि ठेकेदारीमध्ये आमचा हस्तक्षेप असल्याचे एक तरी उदाहरण त्यांनी दाखवावे.” त्यांनी स्पष्ट केले की, आम्ही सिंधुदुर्गातील शैक्षणिक आणि सामाजिक प्रकल्पांसाठी जमिनी घेतल्या आहेत, परंतु त्यातून कुणालाही त्रास होईल असे कोणतेही कृत्य केलेले नाही. गेल्या 35 वर्षांपासून त्यांनी सिंधुदुर्गात जनहिताची कामे केली आहेत, असेही ते म्हणाले.

माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर भेटीसाठी जायचे आणि दुसरीकडे सिंधुदुर्गात निष्ठावंत म्हणून मोठे बॅनर लावायचे, असा दिखावा ते करत आहेत.”

खासदार राणे यांनी विनायक राऊत यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, ‘वैभव नार्इाक हे दहा वर्षे आमदार होते, पण अधिवेशनात ते कधी बोलल्याचे ऐकिवात नाही. याउलट, आमदार झाल्यानंतर नीलेश राणे यांनी पहिल्याच अधिवेशनात मांडलेल्या प्रश्नांचे विरोधकांनीही कौतुक केले.” त्यांनी सांगितले की, नीलेश राणे यांनी सत्तेच्या माध्यमातून सिंधुदुर्गच्या विकासाला गती दिली आहे आणि पालकमंत्री नितेश राणे मच्छीमारांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहेत.

महायुतीतील प्रवेशावर स्पष्ट भूमिका खासदार राणे यांनी सांगितले की, सिंधुदुर्गमध्ये येत असतानाच त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा संकल्प केला आहे. त्यामुळे आगामी काळात रोजगार निर्मितीवर त्यांचा भर असणार आहे. त्या दृष्टीने अदानी उद्योग समूह आणि जिंदाल ग्रुप यांच्याशी त्यांची चर्चा सुरू आहे. दोडामार्ग येथे उद्योग आणण्यासंदर्भातही त्यांची बोलणी सुरू आहे. ते म्हणाले की, 500 पेक्षा जास्त कारखाने आणि एक लाख रोजगार देणार्‍यांनाच जागा दिली जाणार आहे. सिंधुदुर्गचे दरडोई उत्पन्न तीन ते साडेतीन लाखांवर जाईल, असे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यांचे सरकार जिल्ह्याच्या विकासासाठी काम करत आहे. त्यामुळे पाच वर्षानंतर बोला, असेही त्यांनी सांगितले.

‘दोन भाऊ एकत्र आले तर...

ठाकरेंच्या मनोमिलनावर प्रतिक्रिया उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर विचारले असता, खासदार राणे म्हणाले की, त्यांना यावर भाष्य करायचे नाही. ते म्हणाले, “दोन भाऊ एकत्र आले तर आम्हाला नको आहेत का? मात्र, यांचे राजकारण आता संपलेले आहे. त्यामुळे ते एकत्र आल्याने काही फरक पडत नाही.”

तर तो महामार्ग नको...

शक्तिपीठ महामार्गावर भूमिका स्पष्ट शक्तिपीठ महामार्गाविषयी बोलताना खासदार राणे म्हणाले की, ते या रस्त्याचा सिंधुदुर्गला फायदा होणार आहे की नाही, याची माहिती घेणार आहेत. तसेच, या महामार्गामुळे कुणाचे संसार उध्दवस्त होणार आहेत का, याचीही माहिती ते जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकार्‍यांकडून घेणार आहेत. त्यानंतरच ते याबाबतची भूमिका निश्चित करतील. जर या महामार्गामुळे कुणाचे नुकसान होत असेल, तर तो महामार्ग त्यांना नको आहे.

सिंधुदुर्गात कुणालाही प्रवेश नाही...

महायुतीतील घटक पक्षातील प्रवेशावर बोलताना खासदार राणे यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांच्या परवानगीशिवाय सिंधुदुर्गात कुणालाही पक्ष प्रवेश मिळणार नाही. यामुळे त्यांनी आगामी काळात महायुतीतील निर्णय प्रक्रियेत आपली भूमिका अधिक मजबूत असल्याचे संकेत दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news