

नाशिक : सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी तपास योग्य दिशेने सुरू असून, सुशांतसिंहने आत्महत्या केली की, त्याची हत्या करण्यात आली हे चौकशीअंतीच स्पष्ट होईल, नारायण राणे सांगत असतील, तर त्यात तथ्य असेल असा दावा आपत्ती व्यवस्थापन तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केला.
येथे सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता त्यांच्या स्वागतासाठी गिरीश महाजन उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री महाजन म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना वाचविण्यासाठी नारायण राणे यांना फोन केला होता असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी माध्यमांद्वारे केला. नारायण राणे हे वरिष्ठ नेते असून, ते सांगत असतील तर त्यात तथ्य असेल. चौकशीअंती सर्व स्पष्ट होईल, नियमाप्रमाणे सगळे बाहेर येईल असा दावा मंत्री महाजन यांनी केला. कांदा निर्यातीवरील 20 टक्के शुल्क केंद्राकडून माफ करण्यात आले, या निर्णयाचे स्वागत मंत्री महाजन यांनी केले. केंद्राच्या निर्णयाचा फायदा कांदा उत्पादक शेतकर्यांना निश्चितच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सिंहस्थ कुंभमेळ्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेण्यात येईल. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत साधू- महंतांशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.