Who is Sachin Ahir: राजकारणात खळबळ! आदित्य ठाकरेंचा 'राइट हँड' आता शिंदेंसोबत; राजकीय समीकरण बदलणारे सचिन अहिर कोण आहेत?

Who is Sachin Ahir: ठाकरे गटाचे विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Who is Sachin Ahir
Who is Sachin AhirPudhari
Published on
Updated on

Who is Sachin Ahir: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कोण आहेत सचिन अहिर?

सचिन अहिर हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. विशेषतः वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांची राजकीय ताकद वाढवण्यात आणि सलग दोन निवडणुकांमध्ये त्यांना विजय मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका मानली जाते. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाला केवळ पक्षांतर म्हणून नव्हे, तर ठाकरे गटासाठी मोठा राजकीय धक्का म्हणून पाहिले जात आहे.

अलीकडच्या काळात शिवसेनेच्या "ऑपरेशन टायगर" मोहिमेत ठाकरे गटातील अनेक खासदार आणि नेते शिंदे गटात दाखल झाले. त्यानंतर आता सचिन अहिर यांच्या निर्णयामुळे ठाकरे गटातील आणखी एक महत्त्वाचा चेहरा शिंदे गटात गेल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे सध्या पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात दौरे करत असताना, त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील प्रमुख सहकाऱ्यानेच वेगळी भूमिका घेतल्याने या घडामोडीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

कामगार चळवळीतून राजकारणात प्रवेश

सचिन अहिर यांची राजकीय कारकीर्द कामगार चळवळीतून सुरू झाली. १९९३ मध्ये त्यांनी राष्ट्रीय मिल मजदूर संघात काम करण्यास सुरुवात केली. पुढे ते या संघटनेचे सचिव आणि नंतर अध्यक्ष झाले. १९९६ पासून महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे नेतृत्वही त्यांनी केले. माझगाव डॉक, महिंद्रा अँड महिंद्रा यांसारख्या मोठ्या उद्योगांतील कामगार संघटनांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावत वेतनवाढीचे अनेक करार घडवून आणले. त्यामुळे कामगार नेते म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली.

राष्ट्रवादीतून तीन वेळा आमदार

सचिन अहिर यांनी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून सक्रिय राजकारणात पाऊल ठेवले. १९९९ मध्ये शिवडी मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर २००४ आणि २००९ मध्येही त्यांनी विजयाची परंपरा कायम ठेवली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याकडे गृहनिर्माण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्षही राहिले.

Who is Sachin Ahir
Raj Thackeray: राम मंदिरातील गैरव्यवहारावर पंतप्रधानांचं मौन का? भक्तांच्या पैशांचा हिशेब कोण देणार? राज ठाकरेंचा सवाल

२०१९ मध्ये शिवसेनेत प्रवेश

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडत तत्कालीन एकसंध शिवसेनेत प्रवेश केला. त्या वेळी त्यांनी स्वतः निवडणूक न लढवता आदित्य ठाकरे यांच्या विजयासाठी पूर्ण ताकद लावली. वरळीतील संघटनात्मक जाळे मजबूत करण्यात आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

याच योगदानाची दखल घेत उद्धव ठाकरे यांनी २०२० मध्ये त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती केली. पुढे २०२२ मध्ये त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली.

आता शिंदे गटात नवी भूमिका

विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिंदे गटाच्या उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर सचिन अहिर यांच्या राजकीय प्रवासाने नवे वळण घेतले आहे. ठाकरे गटातील विश्वासू आणि संघटनात्मकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाणारे नेते आता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवी राजकीय इनिंग सुरू करत असल्याचे चित्र आहे.

सचिन अहिर यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाच्या संघटनात्मक ताकदीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, विशेषतः मुंबईतील राजकीय समीकरणांवर याचे परिणाम दिसून येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news