मुंबई; पुढारी वृत्तसेवा : केवळ मुंबईच नाही, तर भारतातील लाईफलाईन म्हणजेच रेल्वे सुरू करण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या मान्यवरांमध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांचे नाव आघाडीवर आहे. आज सोमवारी स्व. नाना शंकर शेठ यांची पुण्यतिथी. आज, मध्य रेल्वेचे मुख्यालय, सीएसएमटी येथे सर जिजीभॉय आणि नाना शंकरशेठ यांचा पुतळा आहे, जो रेल्वे सुरू करण्यात त्यांच्या योगदानाची साक्ष देतो. पश्चिम रेल्वे, मुंबई सेंट्रल या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकाला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्यासाठी नामदार जगन्नाथ (नाना ) शंकरशेठ प्रतिष्ठान गेली अनेक दशके लढा देत आहे, मात्र तरीही प्रशासन मात्र महाराष्ट्राच्या या अस्मितेच्या प्रश्नावर ढिम्म आहे.
मुंबई सेंट्रलला शंकर शेठ यांचे नाव देण्याच्या मुद्दयावर आम्ही केंद्र सरकार, रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र सरकार यांना आजवर असंख्य निवेदने देऊन झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्र्यांकडेही हा प्रश्न मांडून झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून तर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. शेवटी रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी तर मुंबई सेंट्रलचे नाव बदलून नाना जगन्नाथ शंकरशेठ यांचे नाव देण्याचा प्रस्ताव देखील मांडला. निर्णय मात्र काही झालेला नाही.
गेल्या सहा महिन्यांत महाराष्ट्रातील तीन शहरांची नावे बदलली आहेत. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि अहमदनगरचे अहिल्यानगर अशी नावे बदलली गेली. गेली अनेक दशके आम्ही लढत आहोत, मात्र निकाल शून्य आहे, असे जगन्नाथ शंकरशेठ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेठ यांनी 'पुढारी'ला सांगितले. प्रतिष्ठानचे सचिव मनमोहन चोणकर म्हणाले की, १९९६ मध्ये आम्ही व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी) चे नाव नानांच्या नावावर ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याने आम्ही तो प्रस्ताव मागे घेतला. मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्यासाठी आम्ही लढत आहोत. २०२० मध्ये राज्य सरकारनेही हा प्रस्ताव मंजूर केला होता, मात्र तो केंद्र सरकारकडे प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत आहे.
नाना शंकरशेठ यांचे खरे नाव मुरकुटे आणि मुरबाडचे जगन्नाथ शंकर होते. कुटुंब समृद्ध होते. त्यांचे वडील व्यवसायाने श्रीमंत व्यापारी होते आणि त्यांचा मूळ व्यवसाय सावकारी होता. जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी झाला आणि ३१ जुलै १८६५ रोजी त्यांचे देहावसान झाले. वयाच्या अठराव्या वर्षी जगन्नाथचे वडील वारले आणि त्यानंतर व्यवसाय सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांनी वडिलांचा वारसा पुढे चालवलाच, पण एक शिक्षक, समाजसेवक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणूनही मोठे काम केले.
देशातील पहिली रेल्वेसेवा सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. १८ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे अशी पहिली भारतीय रेल्वे सुरू झाली आणि ती कंपनी होती- जीआयपीआर. म्हणजे ग्रेट इंडियन पेनिनसुलर रेल्वे कॉर्पोरेशन. कंपनीचे दोन भारतीय संचालक होते, धाकटे जगन्नाथ शंकरशेठ आणि दुसरे जमशेदजी जिजीभॉय ट्रेन सुरू केल्यानंतर रेल्वे स्थानकासाठी पैसा, जमीन यासह आवश्यक ती सर्व मदत करण्यात त्यांनी मागे वळून पाहिले नाही. मुळात 'नानांना' मुंबईत रेल्वे मार्ग बांधण्याची कल्पना सुचली, म्हणून त्यांनी प्रत्यक्षात उतरवली. आज मुंबईची लोकल ही 'लाईफलाईन' आहे. नाना जगन्नाथ शंकरशेठ हे या लाईफलाईनचे जन्मदाते !
केवळ रेल्वेतच नाही तर समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी अनेक सामाजिक कार्ये नानांनी केली. मुंबईच्या एशियाटिक लायब्ररी आणि विधान परिषदेचे पहिले भारतीय सदस्यदेखील होते. मुंबई शहराच्या उभारणीसाठी जमिनीची गरज असताना नानांनी आपली जमीन दिली. नाना शंकरशेठ हे प्रखर शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांच्या प्रयत्नांनी त्यांनी मुंबईतील इतर शैक्षणिक संस्था उभारण्यात मोलाचे योगदान दिले, त्यात मुंबई विद्यापीठ, एल्फिन्स्टन कॉलेज, ग्रँट मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज, जेजे स्कूल ऑफ आर्ट्स कॉलेज, मुंबईतील पहिले मुलींचे कॉलेज अशी शैक्षणिक मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. आज मुंबईला जगात मेट्रो सिटी किंवा 'लाईफलाईन' शहर म्हटले जाते, पण ऐन तारुण्यात नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी दाखवलेल्या दूरदृष्टीमुळे मुंबई रेल्वे रुळावर आहे. त्याशिवाय महानगर ही आर्थिक राजधानी बनली नसती !
केंद्र सरकार या प्रश्नावर निर्णय घेऊ शकत असताना रेल्वे आणि केंद्र सरकार नानासाहेबांच्या योगदानाकडे डोळेझाक करत असून वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या या प्रस्तावाकडे दुर्लक्ष का करत आहे ? नाना महाराष्ट्राचा अभिमान नव्हता का? त्यांचे नाव मुंबई सेंट्रल स्थानकाला देण्यास भाग पाडणे हे महाराष्ट्रातील खासदार, आमदारांचे कर्तव्य नाही काय, असे सवाल करत नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्या पाचव्या पिढीच्या प्रतिनिधी मृदूला प्रकाश चिखलीकर म्हणाल्या, आज मुंबईत नाना शंकर शेठ यांच्या नावावर फक्त एक चौक दिसतो. सरकारने नानांच्या ऐतिहासिक योगदानाचा विसर पडू देऊ नये. मुंबई रेल्वेचे भीष्म पितामह मानल्या जाणाऱ्या नाना जगन्नाथ शंकरशेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला देण्यास केंद्र सरकारने आता आणखी दिरंगाई करू नये.
हेही वाचा :