मुंबई : निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या 'एबी फॉर्म' (AB Form) हा शब्द सर्वाधिक चर्चेत आहे. या फॉर्मसाठी उमेदवारांची मोठी धडपड आणि जिवाची घालमेल सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. हा फॉर्म मिळाला नाही म्हणून अनेक ठिकाणी उमेदवारांचा संताप किंवा डोळ्यांत अश्रू पाहायला मिळाले, तर नाशिकमध्ये भाजपच्या इच्छुकांनी रस्त्यावरच राडा केल्याचेही दिसून आले. नेमका हा एबी फॉर्म काय असतो आणि तो उमेदवारांसाठी का महत्त्वाचा असतो, जाणून घ्या सविस्तर.
निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला एखाद्या राजकीय पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळावी आणि त्या पक्षाचे चिन्ह मिळावे, यासाठी 'एबी फॉर्म' आवश्यक असतो,. यामध्ये 'ए' (Form A) आणि 'बी' (Form B) असे दोन महत्त्वाचे भाग असतात.
• 'ए' फॉर्म (Form A): हा फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करण्यासाठी असतो. यामध्ये उमेदवार कोणत्या जिल्ह्यातून कोणती निवडणूक लढवत आहे आणि त्याला कोणते चिन्ह हवे आहे, याचा तपशील असतो. या फॉर्मवर पक्षाच्या अधिकृत स्वाक्षरी कर्त्यांची माहिती आणि प्रदेशाध्यक्षांचा शिक्का असतो. उदाहरणार्थ, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवाजीराव गर्जे, संजय खोडके आणि आनंद परांसपे यांना स्वाक्षरीचे अधिकार देण्यात आले होते.
• 'बी' फॉर्म (Form B): हा फॉर्म पक्षाच्या उमेदवाराला अधिकृत चिन्ह मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. यामध्ये उमेदवाराचे नाव, पत्ता आणि इतर वैयक्तिक तपशील असतो. या फॉर्मचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, जर मुख्य उमेदवाराचा अर्ज छाननीमध्ये बाद झाला किंवा त्याने माघार घेतली, तर त्याच्या जागी जो पर्यायी उमेदवार पक्षाने दिलेला असतो, त्याचेही नाव या फॉर्ममध्ये नमूद केलेले असते.
प्रत्येक राजकीय पक्षाचा मग तो भाजप, काँग्रेस, शिवसेना किंवा राष्ट्रवादी असो, स्वतःचा स्वतंत्र एबी फॉर्म असतो. उमेदवाराला पक्षाचे नाव आणि अधिकृत चिन्ह मिळवण्यासाठी या फॉर्मची कायदेशीर गरज असते. या एका कागदामुळे उमेदवाराचे राजकीय नशीब पालटू शकते, म्हणूनच राजकीय वर्तुळात या फॉर्मसाठी एवढी ओढाताण पाहायला मिळते.
थोडक्यात सांगायचे तर, एबी फॉर्म म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने आपल्या उमेदवाराला दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि निवडणूक चिन्ह मिळवण्याचा परवानाच असतो.