

पनवेल (मुंबई ) : पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटात घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, याच कारणामुळे पक्षांतर्गत असंतोष चव्हाट्यावर आला आहे. 'संघर्ष नाही, फक्त वारसा' या सूत्रावर तिकीट वाटप होत असल्याचा आरोप करत उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्यांचा सपाटा लावला आहे. पक्षात निष्ठेऐवजी नातेवाईकांना प्राधान्य दिल्याची भावना व्यक्त होत आहेत.
उबाठा गटाचे माजी जिल्हा प्रमुख बबन पाटील यांचे चिरंजीव कैलास पाटील तसेच उप जिल्हाप्रमुख रामदास पाटील यांची सून प्रमिला पाटील यांना निवडणुकीत संधी देण्यात आल्याने, अनेक वर्षे पक्षासाठी राबलेल्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्येही हेच चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधील माजी नगरसेवक सतीश पाटील यांना आणि त्याचवेळी त्यांच्या चिरंजीवांनाही तिकीट देण्यात आल्याने, आघाडीतील घराणेशाहीवर टीकेची झोड उठली आहे. घराणेशाहीविरोधात नेहमीच भूमिका घेणाऱ्या पक्षांमध्येच अशी स्थिती असल्याने, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि संताप दोन्ही वाढताना दिसत आहेत.
या पार्श्वभूमीवर उबाठा गटातील प्रभाग क्रमांक १ मधील शाखा प्रमुख, शहर प्रमुख यांच्यासह सुमारे १५ ते २० पदाधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत पक्षाकडे आपले राजीनामे दिले आहेत. 'पक्षासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्यांना डावलून नातलगांना पुढे केले जात असेल, तर आम्ही का झटावे?' असा थेट सवाल राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
घराणेशाहीला विरोध, हीच एकेकाळी शिवसेनेची ओळख होती. मात्र आता त्याच शिवसेनेच्या एका गटात घराणेशाहीचा 'निवडणुकीचा फॉर्म्युला' राबवला जात असल्याचा आरोप होत आहे. यामुळे केवळ कार्यकर्त्यांचे मनोबल खचले नसून, येणाऱ्या निवडणुकीत याचा फटका पक्षाला बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.