

Maharashtra polls
२०२४ मधील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. तर महायुतीला मोठे यश मिळाले. यानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर शंका घेतली. त्यांनी मतदारांच्या मतांशी छेडछाड केल्याचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महत्त्वाची माहिती दिली आहे.
२०२४ मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वापर करण्यात आलेली सर्व इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (EVM) आणि व्होटर-व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) युनिट्स यांच्या बर्न्ट मेमरी अथवा मायक्रो-कंट्रोलरची तपासणी आणि पडताळणी (C&V) ची मागणी पराभूत उमेदवारांनी केली. तसे अर्जही त्यांनी निवडणूक आयोगाकड केले. त्यानंतर आवश्यक ती पडताळणी केल्यानंतर EVM आणि VVPAT स्लिपमधील मतांमध्ये कोणताही फरक आढळून आला नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
अनेक पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बर्न्ट मेमरीच्या पडताळणीसाठी अर्ज केले होते. याबाबत अपडेट शेअर करताना निवडणूक आयोगाने म्हटले आहे की १० विधानसभा मतदारसंघांतील तपासणी आणि पडताळणीनंतर ईव्हीएम सुरक्षित असून त्यात छेडछाड करता येत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, पनवेल, अलिबाग, खडकवासला, आर्णी, येवला, चंदगड, कोल्हापूर उत्तर आणि माजलगाव या विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम/व्हीव्हीपॅटची बर्न्ट मेमरी अथवा मायक्रोचिप पडताळणीसाठी महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे ८ अर्ज आल्याचे निवडणूक आयोगाकडून गुरुवारी सांगण्यात आले.
८ अर्जदार आणि निवडणूक लढवलेल्या इतर उमेदवारांच्या अथवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत, ४८ ईव्हीएम बॅलेट युनिट्स, ३१ ईव्हीएम कंट्रोल युनिट्स आणि ३१ व्हीव्हीपॅट्सची तपासणी आणि पडताळणी करण्यात आली. यावेळी दोन अर्जदार उमेदवार उपस्थित राहिले नाहीत, असे निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने सांगितले.
अर्जदार उमेदवारांच्या विनंतीनुसार, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, खडकवासला आणि माजलगाव मतदारसंघातील तीन ईव्हीएम संचांच्या बर्न्ट मेमरीची पडताळणी करण्यात आली. यानंतर ईसीआयएलच्या ((ECIL) अधिकृत अभियंत्यांनी प्रमाणित केले की सर्व मशीनचे डायग्नोस्टिक परीक्षण करण्यात आले आहे.
पनवेल, अलिबाग, आर्णी, येवला, चंदगड, कोल्हापूर उत्तर आणि माजलगाव मतदारसंघातील उर्वरित तीन ईव्हीएम संचांची मॉक पोलसह डायग्नोस्टिक चाचणी करण्यात आली. यात ही सर्व ईव्हीएम मशीन्स योग्यरित्या काम करत असल्याचे प्रमाणित झाल्यानंतर त्यावर मॉक पोल घेण्यात आले. ईव्हीएम मशिनमधील मतदानाच्या निकालाची व्हीव्हीपॅट स्लिपमधील मोजणीशी पडताळणी करण्यात आली. त्यात मतांमध्ये कोणताही फरक आढळून आला नाही, असे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे.
गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसने वारंवार ईव्हीएमवर शंका घेतली. मतदार याद्यांमध्ये मनमानीपणे नावे नोंदवण्यात आली आणि तसेच नावे हटवण्यात आली. तसेच मतदानाच्या दिवशी सायंकाळी ५ वाजल्यानंतर मतदानात अनपेक्षित वाढ झाल्यामुळे निकाल भाजपच्या बाजूने लागला, असा आरोप काँग्रेसने केला होता.
याआधीही देशभरातील 'ईव्हीएम'चा अभ्यास आणि विश्लेषण केल्यानंतर असे दिसून आले आहे की, ईव्हीएम इंटरनेटशी जोडलेले नाही. तसेच त्यात कोणतीही वाय-फाय अथवा ब्लूटूथ यंत्रणा नसल्याने त्याला हॅक करता येत नाही.