

मुंबई : वातावरण बदलावरील चर्चा सोप्या भाषेत मांडण्यासाठी आणि त्या सर्वसामान्यांना समजतील अशा पद्धतीने दैनंदिन अनुभवांशी जोडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 22 फुटी वारली भित्तिचित्राचे अनावरण वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेत करण्यात आले. मुंबईत 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान पहिल्यांदाच ‘मुंबई क्लायमेट वीक’ होत असून त्याचाच भाग म्हणून ही कलाकृती साकारण्यात आली आहे.
दिनेश बरप आणि आकाश भोईर या मुंबईस्थित दोन तरुण आदिवासी कलाकारांनी ही कलाकृती साकारली आहे. ‘दोन वाटा, एक वर्तुळ: वातावरण बदल, समाज आणि आपले निर्णय’ याची वारली शैलीतील कथा हे शीर्षक असलेल्या या कलाकृतीत पारंपरिक वारली कला प्रकाराच्या माध्यमातून वातावरण बदलाची कथा मांडण्यात आली आहे. राज्याच्या वातावरणीय कृती कक्षाचे संचालक अभिजीत घोरपडे, राणीच्या बागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी आणि उपसंचालक डॉ. कोमल राऊळ यांच्याहस्ते या भित्तिचित्राचे अनावरण करण्यात आले. मुंबई क्लायमेट वीकचा एक भाग असलेली ही कलाकृती पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘असर सोशल इम्पॅक्ट ॲडव्हाजर्स’ यांनी ‘क्लायमेट कल्चर कलेक्टिव्ह’ या उपक्रमांतर्गत साकारली आहे.
या वारली कलाकृतीची दोन भागांत मांडणी केली आहे. आपण सध्या अनुभवत असलेले वातावरणविषयक वास्तव एका भागात दाखवण्यात आले आहे. वाढती उष्णता, प्रदूषित हवा व जलस्रोत, कमी होत जाणारी जंगले व खुल्या जागा, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे किनारपट्टीच्या भागात येणारे पूर, दुष्काळ तसेच शेतीवर झालेले दुष्परिणाम यांचा यामध्ये समावेश आहे. नागरिक, वन्यजीव यांच्यावर या बदलाचा परिणाम कसा होत आहे, हे या चित्रात मांडले आहे.
दुसऱ्या भागात कचऱ्याचे जबाबदारीने व्यवस्थापन करणे, हरित जागा व जंगलांचे संवर्धन, पर्यावरणाला किमान हानी पोहोचवणाऱ्या स्वच्छ ऊर्जेचा स्वीकार करणे आणि सार्वजनिक ठिकाणांची काळजी या उपाययोजनांचा समावेश आहे. वातावरण बदलावरील कृती केवळ धोरणात्मक कागदपत्रांपुरती मर्यादित नसते, हे या दृश्यांमधून अधोरेखित केले आहे.