

मुंबई: मुंबई हे माझ्यासाठी खूप खास शहर आहे. येथे खेळण्याची संधी मिळते तेव्हा कामगिरी उंचावते. महिला प्रीमियर लीगचे (डब्ल्यूपीएल) विजेतेपद राखण्याचे आव्हान असले तरी मागील हंगामाप्रमाणे ट्रॉफी जिंकण्याच्या उद्देशानेच मैदानावर उतरू, असा विश्वास मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने चौथ्या डब्ल्यूपीएलच्या हंगामपूर्व पत्रकार परिषदेत बुधवारी मुंबईत म्हटले.
महिला विश्वचषक स्पर्धा जिंकल्याने प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास उंचावला आहे. नव्या वर्षाची सुरुवात डब्ल्यूपीएलने होत आहे. कुठल्याही स्पर्धेत माझी ऊर्जा आणि उत्साह तोच असतो. आमची मानसिकताही जिंकण्याचीच आहे. गेल्या तीन हंगामात आम्ही दोन डब्ल्यूपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत.
मात्र, पुन्हा एकदा जेतेपद पटकावण्याचे आमचे लक्ष्य आहे, हरमनप्रीतने सांगितले. दोन विश्वचषक विजेत्या संघात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लिसा कीटली हिची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. तिने मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफमध्ये सर्व महिला असल्याचा आवर्जून उल्लेख करताना, महिलांना सक्षम बनवण्याचा रिलायन्स फाउंडेशनच्या नीता मुकेश अंबानी यांचा उदात्त दृष्टिकोन यातून दिसून येतो, असे लिसा हिने म्हटले.
मेंटॉर आणि प्रशिक्षक झुलन गोस्वामी हिने लिसा हिची उपयुक्तता स्पष्ट करताना, लिसा हिचा 20 वर्षांचा कोचिंग अनुभव आमच्या खेळाडूंसाठी महत्वपूर्ण ठरेल, असे सांगितले. 2023 आणि 2025 हंगामाचे जेतेपद मिळवलेला मुंबई इंडियन्स संघ महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामाची सुरुवात 9 जानेवारी 2026 रोजी बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सविरुद्धच्या लढतीने करेल.