

कोपरखैरणे : नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाणे क्षेत्रात जुन्या वादातून एका युवकाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार मंगळवारी रात्री घडला असून यात दहा ते बारा जणांनी मिळून एकाला घेरले. यावेळी सर्वांनी त्याला बेदम चोप देत शस्त्रांचे सपासप वार केले. ती व्यक्ती निपचित पडल्यावर सर्वांनी पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी रातोरात काहीजणांना ताब्यात घेतले आहे.
लकी शेख, अरहम पटेल, प्रकाश सिंग उर्फ चपटी, अजय निर्मल, वसीम राईं, सोहेम शेख, साहिल उर्फ प्रायवेट , सुफियान खान उर्फ बंबय्या , अपसर पटेल , अमीन खान उर्फ कालिया, मोहम्मद शेख आणि अन्य अशी संशयितांची नावे आहेत. तर अमित यादव असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
मयत यादव आणि संशयित आरोपी हे मूळचे उत्तरप्रदेश येथील असून गेल्या काही वर्षांपासून एपीएमसी भागात असणाऱ्या कोपरी गाव परिसरात राहत आहेत. मयत यादव आणि संशयित आरोपी यांच्यात काही जुने किरकोळ वाद होते. हे वाद मिटवण्यात आले होते. मात्र तरीही संशयितांचे समाधान झाले नव्हते. त्यात यादव हा गेले काही दिवस परिसरात दिसत नव्हता. मात्र मंगळवारी तो कोपरी गाव परिसरात असल्याची माहिती संशयित आरोपींना मिळाली. त्याचा शोध परिसरात घेत असताना यादव हा कोपरी गावातील साईबाबा मंदिर परिसरात आढळून येताच सर्व आरोपी रात्री साडे अकराच्या सुमारास दुचाकीवर आले व चित्रपटातील दृष्याप्रमाणे सर्वांनी त्याला घेरले. यानंतर सर्वांनी त्याला बेदम चोप देत वसीम, अजय, दिनेश , सोहेल यांनी त्यांच्याकडील धारदार शस्त्राने सपासप वार करून यादवला गंभीर जखमी केले. तो मयत होताच सर्वांनी तेथून पळ काढाला.
याबाबत माहिती मिळताच पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त आदिनाथ बुधवंत , वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. जखमी यादवला वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.