MLC Election : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान; २२ जूनला निकाल

नाशिक, भंडाऱ्यात १००% मतदान; बनावट मतपत्रिकेमुळे नाशिकमध्ये संभ्रम
 MLC Election
MLC Electionpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : राज्यात एकीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार फुटीवरून राजकीय घमासान असतानाच दुसरीकडे विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी गुरुवारी मतदान पार पडले. एकूण १७ जागांपैकी ६ जागांवर महायुतीचे उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित ११ जागांसाठी मतदान झाले.

यामध्ये नाशिक आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघात १०० टक्के मतदान झाले. गुरुवारी दुपारी ४ वाजता मतदान संपल्यानंतर सर्व मतपेट्या स्ट्राँग रूमकडे रवाना करण्यात आल्या असून, येत्या सोमवारी म्हणजेच २२ जून रोजी या निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील.

 MLC Election
Nanded MLC Election : वि.प.निवडणुकीत नांदेडमध्ये काँग्रेसच्या मतांची विभागणी?

नाशिक मतदारसंघातील निवडणूक भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांच्यामुळे शेवटपर्यंत चर्चेत राहिली. गीते यांनी बंडाची तलवार म्यान केली असून इथे महायुतीकडून शिवसेना (शिंदे गट) उमेदवाराचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात होता. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही राजकीय नाट्य समोर आले. एकीकडे मतदान प्रक्रीया सुरू असताना समाजमाध्यमांवर ‘पसंती क्रमांक एक-गोकुळ गीते’ अशी एक बनावट मतपत्रिका प्रसारित झाली.

यामुळे महायुतीचे नियोजन कोलमडते की काय, अशा चर्चा रंगल्या. त्यानंतर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी सूत्रे हाती घेतली. त्यांनी गणेश गीते आणि गोकुळ गीते यांना जाहीर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले. यानंतर गीते बंधूंनी माध्यमांसमोर येत, ‘आम्ही महायुतीचा धर्म पाळत निवडणूक आधीच सोडली आहे, आमचा प्रचारही बंद होता. कोणीतरी जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्यासाठी हा खोडसाळपणा केला आहे’, असे आवाहन केले.

अमरावतीत काँग्रेस मतदारांनी पक्षादेश धुडकावला

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेसमधील अंतर्गत यादवी आणि बेबनाव उघडपणे चव्हाट्यावर आला. काँग्रेस पक्षाने आपल्या सदस्यांना या मतदानात तटस्थ राहण्याचा व्हिप बजवला होता. मात्र काँग्रेसच्या तब्बल ९५ नगरसेवकांनी पक्षादेश धुडकावून लावत मतदानात भाग घेतला. तिवसा येथील १२, अमरावतीचे ११ आणि दर्यापूर येथील १ सदस्य वगळता इतर सर्वांनी मतदान केले. काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख हे ५ जूनपासून आजारी असल्याने रुग्णालयात दाखल आहेत. उमेदवाराच्या अनुपस्थितीत पक्षाने घेतलेला तटस्थतेचा निर्णय सदस्यांनीच पायदळी तुडवल्यामुळे काँग्रेसची मोठी नाचक्की झाली आहे.

 MLC Election
MLC Election | अमरावती विधान परिषद निवडणूक : महायुतीमध्ये रस्सीखेच; 'त्रिकोणी' लढतीची शक्यता

६ जागा आधीच बिनविरोध

ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर, पुणे आणि अहिल्यानगर या जागांवर यापुर्वीच महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

कुठे किती मतदान?

  • नाशिक : १०० टक्के

  • भंडारा - गोंदिया : १०० टक्के

  • सांगली - सातारा : ९९.८९ टक्के

  • परभणी - हिंगोली : ९९.७८ टक्के

  • सोलापूर : ९९.६८ टक्के

  • धाराशिव - लातूर - बीड : ९९.४९ टक्के

  • संभाजीनगर - जालना : ९८.९० टक्के

  • नागपूर : ९८.४४ टक्के

  • जळगाव : ९७.७८ टक्के

  • अमरावती : ९४.६८ टक्के

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news