MLC Election | अमरावती विधान परिषद निवडणूक : महायुतीमध्ये रस्सीखेच; 'त्रिकोणी' लढतीची शक्यता

काँग्रेस 'तगड्या' उमेदवाराच्या शोधात
 MLC Election
MLC Electionpudhari photo
Published on
Updated on

Amravati Legislative Council Election

अमरावती : अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीमध्ये उमेदवारीवरून सुरू असलेल्या अंतर्गत रस्सीखेचामुळे भाजपसमोर मोठे आव्हान उभे ठाकले असून, या मतदारसंघात आता 'त्रिकोणी' लढतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ४५३ मतदार असलेल्या या मतदारसंघात १८ जून रोजी निवडणूक होत आहे.

भाजपकडून माजी मंत्री प्रवीण पोटे यांचे नाव आघाडीवर असतानाच, राणा दांपत्याने (रवी राणा व नवनीत राणा) दोन नवीन नावांची घोषणा केल्याने खळबळ उडाली आहे. राणा समर्थकांनी भाजप शहराध्यक्ष नितीन धांडे आणि युवा स्वाभिमान पक्षाकडून सुनील राणा यांच्या नावाची चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे ऐन वेळेवर राणा दाम्पत्य काय भूमिका घेते यावरही भाजपचे भविष्य या निवडणुकीत निश्चित होणार आहे. अपक्ष उमेदवार आणि अंतर्गत कलहाच्या राजकारणामुळे ही निवडणूक त्रिकोणी होण्याची शक्यता आहे.

 MLC Election
Jalgaon MLC Election : राष्ट्रवादीची पहिली 'गुगली', दिलीप खोडपेंनी घेतला उमेदवारी अर्ज; महायुतीत मात्र अजूनही धुसफूस!

संख्याबळाचा पेच:

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपचे संख्याबळ १५० पर्यंत घटले आहे. त्यामुळे विजयासाठी भाजपला आता पूर्णपणे महायुतीतील मित्रपक्षांच्या मतांवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यातच भाजपचे संभाव्य उमेदवार प्रवीण पोटे आणि राणा दांपत्यामधील राजकीय संबंध ताणलेले असल्याचे सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणुकीतही याचे पडसाद उमटले होते, ज्याचा फटका आता या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.

पक्षनिहाय बलाबल

भाजप १५०

काँग्रेस १२०

युवा स्वाभिमानी २६

प्रहार जनशक्ती पक्ष २१

शिवसेना ( शिंदे) १८

राष्ट्रवादी (अजित पवार) ३३

इतर व अपक्ष ४०+

 MLC Election
MLC Election | विधान परिषद : महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्रित निर्णय घेणार

काँग्रेस 'तगड्या' उमेदवाराच्या शोधात

दुसरीकडे, काँग्रेसने अद्याप आपला पत्ता उघड केलेला नाही. काँग्रेस कडे १२० मतदार आहेत. मात्र, सक्षम आणि स्थानिक पातळीवर वैयक्तिक जनसंपर्क असलेला 'तगडा' उमेदवार देण्याच्या हालचाली काँग्रेसकडून सुरू आहेत. २०१४ मध्ये झालेल्या 'क्रॉस व्होटिंग'चा इतिहास पाहता, काँग्रेस यावेळी सावध पावले टाकत आहे.

मात्र भाजपचे घटलेले संख्याबळ, मित्रपक्षांमधील कुरघोडी आणि काँग्रेसची रणनीती यामुळे अमरावतीची ही निवडणूक यावेळी एकतर्फी न राहता 'कांटे की टक्कर' ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news