Nanded MLC Election : वि.प.निवडणुकीत नांदेडमध्ये काँग्रेसच्या मतांची विभागणी?

खासदार आष्टीकर फुटीर गटात, मुलगा ठाकरेंसोबत!
Nanded MLC Election
Nanded MLC Electionpudhari photo
Published on
Updated on

विशेष प्रतिनिधी

नांदेडः विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीच्या मतदानाच्या तोंडावरच नांदेडमध्ये नवा पेच निर्माण झाला आहे. भाजपाच्या विरोधात आपल्या मुलाला निवडणूक रिंगणात उतरवून काँग्रेसचा पाठिंबा मिळविणारे शिवसेना (उबाठा) गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर बुधवारी पक्षातील फुटीर गटात सहभागी झाले. त्यांच्या पुत्राने आपण ठाकरेंसोबत असल्याचे जाहीर केले असले, तरी नव्या घडामोडींतून काँग्रेसच्या मतांची विभागणी होणार, असा अंदाज वर्तविला जात आहे.

खा.आष्टीकर मागील रविवारपर्यंत ठाकरे गटासोबत होते. त्याचदिवशी त्यांनी आपली भूमिका येथे जाहीर केली होती; पण ठाकरे गटाच्या फुटलेल्या आणि नवा गट केलेल्या खासदारांमध्ये सहभागी होण्यासाठी ते हैदराबादमार्गे दिल्लीला गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर येथे उलटसुलट चर्चा सुरू झाली. आष्टीकरांचे पुत्र कृष्णा पाटील हे वरील निवडणुकीत अपक्ष उमेदवार आहेत.

Nanded MLC Election
Raigad ZP Election : भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे कर्जतमध्ये महायुती अडचणीत

ठाकरे गटासह काँग्रेसनेही त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. खा.आष्टीकर फुटीर गटात गेल्यानंतर कृष्णा पाटील यांनी घाईघाईने एक ध्वनीचित्रफीत जारी केली. त्याद्वारे आपण महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंसोबत आहोत असे जाहीर केले असले, तरी येथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले हेही या निवडणुकीतले एक उमेदवार असून वरील घडामोडींनंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनी आता इंगोले यांना मतदान करावे, अशी मागणी पुढे आली आहे. काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी काहीही निर्णय घेतला, तरी येथील राजकीय परिस्थितीत काँग्रेसच्या मतांचे विभाजन अटळ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाने माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी व त्यांच्या यंत्रणेने पहिल्या काही दिवसांतच आवश्यक ते नियोजन करून बहुसंख्य मतदारांना सहलीवर पाठविले. सहलीवर गेलेले नगरसेवक बुधवारी लातूर येथे एकत्र जमले.

पक्षनेते खा.अशोक चव्हाण सकाळीच लातूरकडे रवाना झाले. भाजपाने ४५२ मतदारांपैकी तीनशेहून अधिक मतदारांची जुळवाजुळव आधीच केली होती. मजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक राजूरकरांच्या सोबत असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादीने आपल्या सर्व नगरसेवकांवर ‘व्हीप’ (पक्षादेश) बजावल्याचे जिल्हाध्यक्ष शिवराज होटाळकर यांनी सांगितले.

Nanded MLC Election
Amravati MLC Election | अमरावती विधान परिषद निवडणूक: काँग्रेसचा 'व्हीप' झुगारून नगरसेवकांचे मतदान; पक्षात उभी फूट?

मतदानाच्या तोंडावरच खा.आष्टीकर शिवसेना ठाकरे गटाच्या फुटीर गटामध्ये सामील झाल्यामुळे बुधवारी येथे एकच खळबळ उडाली. काँग्रेसचे काही नगरसेवक आधीच आष्टीकरांच्या विरुद्ध होते. आता त्यांच्या नव्या राजकीय भूमिकेमुळे काँग्रेसच्या मतांमध्ये मोठी विभागणी होईल तसेच जास्तीत जास्त मते राजूरकरांकडेच जातील, असा अंदाज वर्तविला जात आहे. राजूरकरांना पावणेचारशेहून अधिक मते मिळतील असा विश्वास भाजपाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.

आज मतदान

विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवार, १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या दरम्यान मतदान घेण्यात येणार आहे. महापालिकेत निवडून आलेले आणि स्वीकृत नगरसेवकांसह जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष आणि सदस्य आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी ८ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. सोमवारी दि. २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

काँग्रेस पक्षाकडून व्हीप जारी

दरम्यान विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसनेही पक्षादेश जारी केला असून प्रदेश काँग्रेसने महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून कृष्णा नागेश पाटील आष्टीकर यांना पाठिंबा दिल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार महानगरपालिका सर्व नगरपारिषद, नगर पंचायतमधील सर्व काँग्रेस पक्षाचे नगरसेवक मतदार यांनी आघाडीचे पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांनाच मतदान करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

मतदानाची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्या दृष्टिकोणातून तसेच निवडणूक कालावधीत कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यादृष्‍टीने गुरुवार 18 जून रोजी मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news