Fake Caste Certificate: सायन वैद्यकीय महाविद्यालयात बनावट जात प्रमाणपत्राचा पर्दाफाश; एमबीबीएस प्रवेश रद्द
मुंबई : सायनच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आरक्षणाचे उल्लंघन करत बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चौकशीनंतर प्रशासनाने तत्काळ कठोर कारवाई करत संबंधित विद्यार्थिनीचा प्रवेश रद्द केला आहे. मात्र या फसवणुकीमुळे सरकारी एमबीबीएसची एक जागा वाया गेली असून, एका पात्र विद्यार्थ्याचे भविष्य हिरावले गेले आहे.
महापालिकेच्या सायन वैद्यकीय महाविद्यालयात समृद्धी शशिकांत राजपूत हिचा 2024-25 या शैक्षणिक वर्षातील प्रवेश तत्काळ रद्द केला आहे. तिने विमुक्त जातीच्या ‘अ’ श्रेणीतील विद्यार्थ्याच्या नावाने सादर केलेले जात वैधता प्रमाणपत्र तपासणीत पूर्णतः बनावट असल्याचे निष्पन्न झाले. जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने स्पष्ट केले की, संबंधित विद्यार्थिनीला कधीही जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आलेले नव्हते. तरीही, बनावट कागदपत्रांच्या आधारे तिने केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेतून सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने कठोर आदेश जारी करत प्रवेश रद्द करण्याचे निर्देश दिले.
सात दिसांत वसतिगृह रिकामे करण्याचे आदेश
10 लाखांचा हा दंड महानगरपालिकेला डिमांड ड्राफ्ट किंवा पे-ऑर्डरद्वारे भरावा लागणार आहे. याशिवाय, विद्यार्थिनीची वसतिगृहातील राहण्याची परवानगी तात्काळ रद्द करण्यात आली आहे.
सात दिवसांत वसतिगृह रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कॉलेजची सर्व ओळखपत्रे व कागदपत्रे त्वरित परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

