

उत्तर प्रदेशात ( UP Election ) दुसर्या टप्प्यातील मतदानात मुस्लिमबहुल भागातील बंपर मतदानाचे राजकीय जाणकार आपापल्या परीने विश्लेषण करत आहेत. या टप्प्यात 55 पैकी 40 जागांवर म्हणजेच 80 टक्के जागांवर मुस्लिम मतदारांची टक्केवारी निर्णायक आहे. गेल्या काही निवडणुकांचे विश्लेषण केले तर ज्या पक्षाने दुसर्या टप्प्यात सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत तोच पक्ष 'सिकंदर' ठरला आहे. विरोधी पक्षांना येथे सिकंदर ठरलेल्या पक्षास पछाडणे जवळपास अशक्य राहिले आहे.
उत्तर प्रदेश विधानसभेच्या ( UP Election ) दुसर्या टप्प्यात 64.42 टक्के मतदान झाले. जे पहिल्या टप्प्यापेक्षा (62.4 टक्के ) जास्त असले तरी 2017 च्या मतदानाच्या (65.53 टक्के ) थोडे कमीच आहे. दोन कोटींहून अधिक मतदारांनी 586 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला ईव्हीएममध्ये कैद केला आहे. निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी असला तरी राजकीय वर्तुळात मतदानाच्या पॅटर्नच्या आधारे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
2017 ची विधानसभा निवडणुकीतही खरा सामना भाजप विरुद्ध सपा असाच झाला होता आणि आताही तशीच स्थिती आहे. पण, सध्या लाट कुणाचीही नाही. अलबत, निवडणुकीपूर्वी मुस्लिम आणि शेतकर्यांमध्ये सरकारविरोधात राग दिसून आला होता. पण तो मतदानातही कायम राहणार का, हे कळायला काही काळ जावा लागेल. सध्या सर्वच पक्ष, विशेषतः सपा आणि भाजपने विजयाचा दावा केला आहे. भाजपला आशा आहे की, सवर्णांसह दलित आणि मागास जातीतील लाभार्थी भाजपलाच मतदान करतील. समाजवादी पार्टीला मुस्लिम, यादव आणि जाट समीकरणाच्या आधारे जिंकण्याची आशा आहे.( UP Election )
गत विधानसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर ज्या पक्षाने दुसर्या टप्प्यात जास्त जागा जिंकल्या तोच यूपीचा सिंकदर बनलल्याचे दिसते. 2017 मध्ये दुसर्या टप्प्यातील 55 पैकी 38 जागा भाजपने जिंकल्या होत्या आणि भाजपचे सरकार स्थापन झाले. तेव्हा सपा आणि काँग्रेसला अनुक्रमे 15 आणि 2 जागा मिळाल्या होत्या. 2012 मध्ये या टप्प्यात 40 जागा जिंकून समाजवादी पक्ष सत्तेत आला. तेव्हा भाजपला केवळ 4 जागा मिळाल्या होत्या. 2007 मध्ये या टप्प्यात 35 जागा बसपाने जिंकल्या आणि त्यांचेच सरकार बनले होते. तेव्हा सपाने 11 आणि भाजपने 7 जागा जिंकल्या होत्या.