

मुंबई : ‘‘भारतीय जनता पक्षाची विचारधारा आणि मराठी माणूस हे समीकरण अविभाज्य आहे. आमचे मराठीपण हे केवळ शब्दांपुरते मर्यादित नसून, ते मराठी संस्कृती, अस्मिता आणि सकारात्मकतेचा प्रसार करणारे 'अनेकवचनी' व व्यापक आहे,’’ असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांचा कडक शब्दांत समाचार घेतला.
विरोधकांवर टीका करताना चव्हाण म्हणाले की, "मराठी भाषेच्या नावाखाली राजकारण करणे थांबवा. हा काही 'विषामृत' खेळ नाही. विरोधकांची भूमिका नकारात्मकतेने भरलेली असून, ज्ञानेश्वर माऊलींच्या 'विश्वात्मके देवे' या वैश्विक तत्त्वाशी त्यांची कोणतीही बांधिलकी नाही, हेच त्यांच्या वागण्यातून सिद्ध होते."
भाजप आणि मराठी माणूस यांच्यातील नाते स्पष्ट करताना प्रदेशाध्यक्ष म्हणाले, "मराठी माणसानेच स्थापन केलेल्या मातृसंस्थेची विचारधारा भाजप जोपासत आहे. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या तीनही मराठी थोर व्यक्तींच्या विचारांनी प्रेरित होऊन देश आणि समाज घडवण्याचे काम भाजप वर्षानुवर्षे करत आहे."
मराठी भाषेसाठी भाजप सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचताना चव्हाण म्हणाले की, मराठी भाषेला 'अभिजात' दर्जा मिळवून देण्याचे ऐतिहासिक काम भाजपने केले. जगभरात साजरी होणारी 'गुढीपाडवा शोभायात्रा' ही भाजप कार्यकर्त्यांच्याच संकल्पनेतून प्रथम सुरू झाली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरात राहणाऱ्या मराठी भाषिकांच्या उन्नतीसाठी भाजप कटिबद्ध आहे,’ असे सांगितले.
राज्याची प्रगती आणि नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासोबतच, एक देशभक्त आणि संस्कारित पिढी तयार करण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत, असे आवाहनही रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केले. "आमचे मराठीपण हे संकुचित नसून सर्वसमावेशक आहे," असा पुनरुच्चार त्यांनी शेवटी केला.