

गौरीशंकर घाळे
मुंबई : मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी आज गुरुवारी प्रत्यक्ष मतदान पार पडेल. गेल्या बारा दिवसांतील जाहीर सभा, मुलाखती आणि आरोप - प्रत्यारोपांच्या फैरींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचाराच्या या सर्वपक्षीय झंझावातानंतर आता आपला हक्काचा मतदार, प्रत्यक्ष मतदान केंद्रापर्यंत पोहचावा, यासाठी उमेदवार आणि पक्षांची तयारी सुरू आहे. त्यासाठी बूथस्तरावर कार्यकर्त्यांची यंत्रणा उभारली जात आहे. मतदानाचा टक्का आणि निकालाचे समीकरण लक्षात घेत हक्काचा मतदार उतरविण्याची रणनीती आखली जात आहे. विशेषतः प्रतिष्ठेची बनलेल्या मुंबईतील लढतीतील मतदानाची टक्केवारी कायम राहणार की त्यात घट होणार, याबाबत उत्सुकता आहे.
मुंबई महापालिकेच्या मागील पाच निवडणुकीतील मतदानाचा टक्का लक्षात घेतल्यास 2017 च्या निवडणुकीत सर्वाधिक 55.28 टक्के मतदान झाले होते. 2012 च्या तुलनेत 2017 साली तब्बल 10.53 टक्के मतदान वाढले होते. मुंबईतील राजकीय समीकरणेच या निवडणुकीने बदलली होती. एकसंध शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान देत भाजपने तुल्यबळ प्रदर्शन केले. या निवडणुकीत शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. साडेदहा टक्क्यांचे वाढीव मतदान भाजपच्या पथ्यावर पडले होते. तर, मनसे आणि काँग्रेसला सर्वाधिक फटका बसल्याचे निकालातून समोर आले. दरम्यान, मागील निवडणुकीचा अपवाद सोडल्यास मुंबईतील मतदानाची टक्केवारी ही चाळीसच्या घरात राहिली. 2012 साली मुंबईत 44.75 टक्के मतदान झाले. तर, 2007 साली 46.05 टक्के, 2002 सालच्या निवडणुकीत 42.05 टक्के तर 1997 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत 44.36 टक्के मतदान झाले होते.
यंदा भाजप वर्चस्व राखणार?
राज्यात 2015 ते 2018 दरम्यान 27 महापालिका होत्या. या कालावधीतील निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक 1 हजार 99 नगरसेवक निवडून आले होते. तर, एकसंध शिवसेनेचे 489 आणि एकसंध राष्ट्रवादीने 294 जागांवर विजयाची नोंद केली होती. काँग्रेसचे 439 नगरसेवक विजयी झाले. तर, राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 26 तर मायावतींच्या बसपचे 38 नगरसेवक होते. शेकाप, बहुविकास आघाडीसह इतर नोंदणीकृत पक्षांचे 154 आणि 89 अपक्ष म्हणून निवडून आले होते. यंदाच्या लढतीत भाजप आपले वर्चस्व राखणार का, ठाकरे बंधूंच्या युतीचा काय परिणाम होणार, शिवसेना शिंदे गट मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकेत कशी कामगिरी बजावेल याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष असणार आहे. तसेच, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादीचा कस लागणार आहे.