Political News: 'फक्त मंत्री नाही, सरकारच बदलायचं'; उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर जोरदार हल्ला

सत्ताभ्रष्टांना बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही; शिवाजी पार्कवर निदर्शने
Uddhav Thackeray on Modi government
Uddhav Thackeray on Modi government Pudhari
Published on
Updated on

Uddhav Thackeray on Modi government

मुंबई: जे सरकार आपल्याला रोजीरोटी देऊ शकत नाही, शिक्षण रोजगार देत नाही, उत्तर देत नाही, असले सरकार बदलण्याचा लढा सुरू झाला पाहिजे. आता फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नको, सरकारच बदलायचे आहे.

हा लढा फक्त सोनम वांगचुक यांचा नाही, सरकार विरोधातील ही आग सरकार बदलेपर्यंत टिकली पाहिजे. सरकार टिकता कामा नये, या आगीत सरकार भस्म झाले पाहिजे, असे सांगत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारविरोधात व्यापक लढा उभा करण्याचे आवाहन केले. तसेच सत्ताभ्रष्टांना बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ घेऊन आंदोलनाला सुरुवात करूया, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने रविवारी शिवाजी पार्क येथे निदर्शने केली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, सुषमा अंधारे तसेच अन्य नेते उपस्थित होते.

आंदोलनस्थळी सोनम वांगचुक, अभिजित दीपके यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतानाच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आता घालवले पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray on Modi government
Ramesh Mhatre surrender : महिला डॉक्टर मारहाण प्रकरण, अखेर शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांसमोर शरण

दिल्लीतील आंदोलन हे आता फक्त जंतरमंतरपुरते मर्यादित ठेवायचे नाही. तर, देशाच्या कानाकोपऱ्यात हे गेले पाहिजे, ‘गली गली में शोर है’ची घोषणा गावागावांत गेली पाहिजे, असे आवाहन करतानाच ‘मोदीजी तुम्हाला वन नेशन, वन इलेक्शन घ्यायचं ना? मग आजच घ्या,आम्ही तयार आहोत. या माजलेल्या सत्ताधाऱ्यांना ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.

तसेच, इथे आपले पंतप्रधान झुरळाला घाबरतात. सरकार घाबरते, जगातील मोठा पक्ष झुरळाला घाबरतो. त्यांनी भाड्याने माणसं घेतली. चोरून आणलेली माणसे आहेत त्यांच्याकडे. त्यांचे स्वतःचे कुणी नाही म्हणून हे झुरळाला घाबरतात, असाही टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला. तरुणांना तुम्ही कॉक्रोच म्हणता.

तुम्ही गादीवर बसला. स्वातंत्र्य मिळाले नसते तर तुम्हाला बुड टेकवायला गादी मिळाली नसती. स्वातंत्र्य सैनिक फासावर गेले. ते याच वयातले होते. ती काय झुरळं होती? झुरळांमुळे तुम्हाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हाच्या तरुण मुलांनी बलिदान केले नसते, तर आज स्वातंत्र्य पाहायला मिळाले नसते.

ज्यांनी बलिदान केले ते स्वातंत्र्य आपण टिकवणार की नाही. होय मीही झुरळ आहे. तरुणांना तुम्ही झुरळ म्हणत असाल तर त्यांचे आईवडीलही झुरळच आहेत. मग हा देश काय झुरळ आहे. आम्हाला झुरळ म्हणणाऱ्यांना मी गोचिड म्हणतो. हे सत्तेला चिकटलेले गोचिड आहेत. या गोचिडांना सत्तेतून काढले पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray on Modi government
School Bus Tree Fall Incident: चेंबूर दुर्घटनेची चौकशी आयआयटीमार्फत करणार: महापौर रितू तावडे

पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करणार - आदित्य ठाकरे

देशाला अशिक्षित ठेवा, अंधभक्त बनवा हा एकच भाजपचा कारभार आहे. आम्ही अंधभक्त राहू तर या देशाच्या मातीचे राहू. आम्ही अंधभक्त राहू तर फुले-शाहू- आंबेडकरांचे राहू, आम्ही अंधभक्त राहू तर शिवरायांचे राहू. आम्ही भाजपसमोर झुकणार नाही, वाकणार नाही. देश बदलण्यासाठी ज्यांना कौल मिळाला होता, आज तेच संविधान बदलायला निघाले आहेत. त्यांच्या विरोधात लढायचे आहे, असे आदित्य ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.

अलीकडेच इस्रोच्या १०० शास्त्रज्ञांनी राजीनामा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपला इस्रोसारख्या महत्त्वाच्या संस्था सांभाळता येत नाहीत, पण दुसऱ्या पक्षांचे खासदार फोडण्यात ते व्यस्त आहेत.

महाराष्ट्राचा अभिजित दीपके हा तरुण मुलगा आज दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी उपोषणाला बसला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, ही त्याची प्रमुख मागणी आहे.

मात्र, भाजप सरकार तरुणांच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी जनतेला धर्म आणि जातीच्या वादात अडकवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. आता आम्ही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहोत, पुढे जाऊन थेट या देशाच्या पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहोत, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

आंदोलकांचा ठिय्या

आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतरही आंदोलकांनी शिवाजी पार्क मैदान परिसरातच ठिय्या मांडला. यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. बराच काळ आंदोलक हटत नसल्याने पोलिसांना त्यांना पांगवण्यासाठी अतिरिक्त कुमक मागवावी लागली.

पाकसोबत चर्चेची तयारी, मग वांगचुक सोबत का नाही?

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले की, मी काल नागपुरात होतो. तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं केंद्र आहे. या संघाच्या पदाधिकाऱ्याने मे महिन्यात पाकिस्तानसोबत चर्चा केली पाहिजे, असे विधान केले. त्याला मोहन भागवत यांनीही आपण हिटलरसारखे नसल्याचे सांगत पाठिंबा दिला. भागवत यांनी हे वाक्य मोदींना सांगावे.

जो पाकिस्तान आतंकवादी घुसवतो, हल्ले करतो, त्यांच्याबरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजे, पाकिस्तानसोबत चर्चेची तयारी आहे. मग वांगचुकसोबत का नाही करत? जो देश सैनिकांचे बळी घेतो त्याच्याशी चर्चा आणि जो माणूस सैनिकांसाठी सोलार टेंट बनवतो त्याच्याशी चर्चा नाही, असेही ठाकरे म्हणाले.

तिकडे चॉकलेटच्या गोळ्या आणि आमच्या तरुणांना बंदुकीच्या गोळ्या. आम्ही देशभक्त आहोत, हिंदू आहोत. आमचे हिंदुत्व हे शेंडी, जानव्याचे नाही. म्हणून जे आज देशात सुरू आहे हे तुमच्या कल्पनेतील हिंदू राष्ट्रात चालते का, असे मोहन भागवत यांना प्रश्न केला. हे तुमचे हिंदू राष्ट्र असेल तर आम्हाला हे हिंदू राष्ट्र मान्य नाही, असेही ठाकरे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news