

MNS Setback In Bandra Mumbai: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) वांद्रे परिसरात मोठा धक्का बसला आहे. पक्षाची स्थापना झाल्यापासून म्हणजेच तब्बल १९ वर्षे ९ महिने पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या ११ महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर वांद्रे पश्चिम आणि पूर्व भागातील या घडामोडीमुळे मनसेच्या गोटात खळबळ उडाली आहे.
वांद्रे येथील प्रभाग क्रमांक ९७ आणि प्रभाग क्रमांक ९८ मधील या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे थेट पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. १९ वर्षांहून अधिक काळ पक्षासाठी रक्त आटवणाऱ्या या कार्यकर्त्यांनी अचानक साथ सोडल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. प्रामुख्याने विभाग पातळीवरील अंतर्गत नाराजी या राजीनामा सत्रामागे असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे बंधूंच्या (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) युतीनंतर जागावाटपाची समीकरणे बदलली आहेत. वांद्रे येथील या दोन प्रभागांपैकी एक जागा शिवसेना (UBT) कडे गेली आहे, तर दुसरी जागा मनसेच्या दीपिका काळजे यांना देण्यात आली आहे. जागावाटपात आपल्या विभागातील कार्यकर्त्यांना डावलले गेल्याची भावना किंवा उमेदवारी देताना स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्याने ही टोकाची भूमिका घेतली गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पत्रात केवळ "आम्ही राजीनामा देत आहोत" इतकाच उल्लेख केला असून, त्यामागील सविस्तर कारणांबाबत अद्याप मौन बाळगले आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील बालेकिल्ल्यात जर असे राजीनामे पडत असतील, तर त्याचा मोठा फटका पक्षाला बसू शकतो.
आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे या ११ नाराज पदाधिकाऱ्यांची मनधरणी करणार की वांद्र्यासाठी नवीन फळी उभी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १९ वर्षांचे जुने जाणते कार्यकर्ते सोडून गेल्याने कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.