
Uddhav Thackeray On Shivsena UBT- MNS Alliance
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या माजी नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युती करायची की नाही, असा प्रश्न विचारत पक्षातील पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेतला. माजी नगरसेवकांनीही युतीसाठी अनुकूलता दर्शवल्याने आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत जाणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजताच सध्या सर्व राजकीय पक्षांमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. सोमवारी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर मुंबईतील माजी नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना मनसेसोबत युती करायची की नाही, अशी विचारणा केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी ‘पुढारी न्यूज’ला सांगितले. यावर माजी नगरसेवकांनीही युती केली तर फायदाच होईल अशी कबुली दिली. मुंबईत युती संदर्भात अनुकूल वातावरण असल्याचंही माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं.
माजी नगरसेवकांनी मोकळेपणाने उत्तर देताच उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्हीसोबत राहिलात, तुम्ही निष्ठावंत आहात येत्या काळात अनेक बैठका घ्यायच्या आहेत. मुंबई महानगर पालिकेसाठी आपल्याला ज्या पक्षासोबत युती करायची त्यासाठी तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेईन.
माजी नगरसेवकांनी शिवसेना भवन येथे येऊन सामान्यांचे प्रश्न सोडवावेत. शिवसेना भवन येथे निवडणूक कार्यालय उघडणार असल्याचेही ठाकरेंनी सांगितले.
‘पुढारी’च्या कौलमध्ये जनतेनं काय उत्तर दिलं?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्र येणार का, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे समर्थक हे युतीसाठी तयार असल्याचे सांगत असले तरी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांमध्ये चर्चेपलीकडे याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर पुढारी डिजिटलने X या सोशल मीडिया प्लाटफॉर्मवर पोल घेतला. यात 77.6 टक्के वाचकांना वाटते की उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र आले पाहिजे. तर 16. 1 टक्के वाचकांना ठाकरे बंधूंनी एकत्र येवू नये असे वाटते. 6.5 टक्के वाचकांनी तटस्थ राहणे पसंत केले.