

नाशिक : आमच्याकडे गँग आहे, ठाकरे सेनेला राज्यात गळती लागली आहे. त्यांच्याकडे केवळ 'हम दो हमारे दो'च उरले आहेत. त्यामुळे त्यांचा अधिक विचार करण्याची गरज नाही. बाळासाहेब ठाकरे असताना सामना सर्वत्र वाचला जायचा, आता रात्रीची न उतरलेले लोक त्यात लिहितात त्यामुळे त्याचे महत्त्व संपले आहे. हे भारतीय जासूस मनघडन कहानिया सामनात लिहितात, असा टोला सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना लगावला.
जागतिक धम्म परिषदेनिमित्त ते नाशिकमध्ये आले असता, त्यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. मंत्री शिरसाट म्हणाले, सूर्यवंशी कुटुंबाला संपूर्ण सरकारचा पाठिंबा आहे. अवघ्या ८० दिवसांत आरोपपत्र कोर्टात सादर करण्यात आले आहे. बीड, परभणी पोलिस या प्रकरणी वेगाने काम करीत आहेत. पुण्यातील स्वारगेट महिला अत्याचारप्रकरणी, महायुती सरकारच्या काळात मंत्र्यांच्या मुलींना जो न्याय तोच सर्वसामान्यांच्या मुलींनाही न्याय असल्याने याप्रकरणी राजकारण करणे योग्य नाही. अत्याचार करणार्यांना भररस्त्यात फोडले पाहिजे हीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
अधिवेशनात विरोधकांकडे बोलण्यासारखे काहीच उरले नाही, त्यामुळे ते मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंचे नाव घेऊन सभात्याग करू शकतात, असेही ते म्हणाले. मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही केली. याबाबत विचारले असता, आठवलेंची ही मागणी भाजपकडे आहे, भाजपने त्याचा विचार करावा, असे शेवटी त्यांनी सांगितले.
नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत बोलताना ते म्हणाले, पालकमंत्रिपदाचा तिढा अधिवेशनात सुटेल. कुणी कितीही बॅनरबाजी केली तरी अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांचाच असणार आहे. त्यामुळे हा निर्णय अधिवेशनातच होईल. लवकरच त्याबाबत घोषणा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.