Maharashtra Politics: ‘मातोश्री’वरील बैठकीस ४ खासदार प्रत्‍यक्ष तर ५ जण ऑनलाईन हजर

आमचे संसदीय दल एकजूट, ऑपरेशन ‘वूल्फ’ राबविणार : संजय राऊत
Maharashtra Legislative Council election
Maharashtra Legislative Council electionPudhari
Published on
Updated on

मुंबई: शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या ‘मातोश्री’ निवासस्थानी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीस पक्षाच्या ९ खासदारांपैकी ४ खासदारांनी प्रत्यक्ष, तर ५ खासदार ऑनलाईन उपस्थित होते. शिवसेना शिंदे गटाकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबविले जाणार असल्याच्या चर्चांमुळे या बैठकीतील खासदारांच्या उपस्थितीवरून राजकारण तापले आहे.

मात्र, आमचे संसदीय दल एकजूट आहे. कसलेही ऑपरेशन टायगर वगैरे नाही, आम्हीच सर्व टायगर आहोत. आता आम्ही ‘ऑपरेशन वूल्फ’ (लांडगा) राबविणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या बैठकीनंतर केला. तसेच जे प्रत्यक्ष हजर नव्हते ते खासदार येत्या दोन-तीन दिवसांत उद्धव ठाकरेंची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.

Maharashtra Legislative Council election
Navi Mumbai Unauthorized Constructions: अनधिकृत बांधकामांना पुन्‍हा नोटिसा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच ‘ऑपरेशन टायगर’ राबविणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. ठाकरे गटाचे सात खासदार हे गळाला लागले असून लवकरच त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी रविवारी ‘मातोश्री’वर पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली होती.

या बैठकीलाही काही खासदार अनुपस्थित राहणार असल्याच्या तसेच सकाळपासून काही खासदार नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र संजय राऊत यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सर्वच्या सर्व ९ खासदार बैठकीला प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन उपस्थित असल्याची माहिती खासदारांच्या नावासह दिली.

कसलेही ऑपरेशन टायगर वगैरे नाही, आम्हीच सर्व टायगर आहोत. आता आम्ही ऑपरेशन वूल्फ (लांडगा) राबविणार आहोत, सर्व खासदार एकजूट आणि निष्ठेने शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे आहेत,बैठकीत आदित्य ठाकरे उपस्थित होते. आता तरी अफवांचा बाजार बंद होईल ही अपेक्षा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Maharashtra Legislative Council election
Mumbai Drain Cleaning: नालेसफाईत एआयने शोधल्‍या त्रुटी

कोण येणार, कोण जाणार कल्पना नाही : मुख्यमंत्री

ऑपरेशन टायगर आणि ठाकरे गटाच्या खासदारांच्या बैठकीबाबत मला काही कल्पना नाही. कोण येणार आहे, कोण जाणार आहे. आता बैठक झाली की कोण कोण होते किंवा कोण नव्हते, हे माध्यमांनीच सांगावे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या आमदारांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची घेतलेली भेट यात वेगळे काही नाही. त्यात फक्त प्रेम आहे, विशुद्ध प्रेम आहे, दुसरे काही नाही. त्याचा दुसरा कोणताही अर्थ लावू नका.

बैठकीला प्रत्‍यक्ष उपस्‍थित खासदार

१. अनिल देसाई (मुंबई दक्षिण मध्य)

२. अरविंद सावंत (दक्षिण मुंबई)

३. संजय दीना पाटील (मुंबई उत्तर पूर्व)

४. राजाभाऊ वाजे (नाशिक)

अनुपस्‍थित खासदारांची कारणे

१. ओमराजे निंबाळकर (धाराशिव). कारण : मुलगा आजारी

२. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी). कारण : पत्‍नी आजारी

३. नागेश आष्टीकर (हिंगोली). कारण : मुलाचा निवडणूक प्रचार

४. संजय देशमुख (यवतमाळ). कारण : मुलीच्‍या लग्‍नाची गडबड

५. संजय जाधव (परभणी). कारण : पूर्वनियोजित कार्यक्रम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news