Uddhav Thackeray Dussehra Rally: सत्ता बदलासाठी महाराष्ट्र भवानी तलवारीसारखा तळपला पाहिजे! शिवाजी पार्कवरून उद्धव ठाकरे यांची जनतेला हाक

शिवाजी पार्कवरील मेळाव्यात मतदार यादीतील कथित घोळ, शेतकरी मदत, कायदा-सुव्यवस्था आणि जेन झी आंदोलनावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली.
Uddhav Thackeray Dussehra Rally
Uddhav Thackeray Dussehra RallyPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: भाजपने स्वप्ने दाखवून देशातील जनतेला फसविले आहे. भाजपने केलेला हा सगळ्यात मोठा संभ्रम घोटाळा आहे. पण आता देश बदलत आहे. भारतमातेला जाग आली आहे. होय, आम्ही केंद्रातील सत्ता बदलण्यासाठी उभे आहोत.

या सत्ताबदलाचे रणकंदन होणार असून यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा, संतांचा आणि समाजसुधारकांचा हा महाराष्ट्र भवानी तलवारीसारखा तळपला पाहिजे, अशी हाक शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दसरा मेळाव्‍यातून दिली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हीरक महोत्सवी दसरा मेळावा शिवाजी पार्कवर परंपरेनुसार मोठ्या उत्साहात झाला. या मेळाव्याला शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. उद्धव काय बोलणार याचे अंदाज सर्वांनीच बांधलेले होते ते खरे ठरले.

लोकशाही, मतचोरी, जेन झीचे आंदोलन, मतदानाचा अधिकार आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता हे मुद्दे उद्धव यांच्या भाषणाच्या केंद्रस्थानी होते. शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त राज्य सरकारने जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीवर उद्धव यांनी सडकून टीका केली. स्वतःची खुर्ची वाचविण्यासाठी आमदारांना ५० खोके देता, पण शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत. ५ हजार देता, या राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे, असे त्यांनी सरकारला फटकारले.

Uddhav Thackeray Dussehra Rally
Dussehra Gold Sale: दसऱ्याला सोन्याची जोरदार खरेदी! राज्यात २ दिवसांत एक हजार कोटींची सोन्याची उलाढाल

उद्धव म्हणाले, दुष्काळाचे रूप अक्राळ विक्राळ आहे. मागचीच मदत अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. आता ५ हजारांची मदत सरकार देणार आहे. कर्जमाफी मिळालेली नाही. केवळ आकड्यांचा खेळ सुरू आहे. परभणीत सहलीला जाण्यासाठी मुलाला पैसे देता आले नाहीत म्हणून शेतकऱ्याच्या मुलाने आत्महत्या केली, अशी विदारक परिस्थिती आहे.

भाषणाच्या सुरुवातीलाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा उल्लेख उद्धव यांनी केला. या निमित्ताने शिवाजी पार्कच्या नामकरणालाही शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मैदानासाठी नेता आणि नेत्यासाठी मैदान असा योगायोग कायम असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्राला कलंक

अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबाराचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. पोलिसांनी आरोपींना पकडले. पण शस्त्रधारी व्यक्ती घटनास्थळी पोहोचेपर्यंत यंत्रणांना माहिती का मिळाली नाही, असा सवाल उद्धव यांनी केला.

ते म्हणाले, महाराष्ट्र हे शहरी नक्षलवादाचे केंद्र बनले आहे, असा दावा राज्य सरकारने अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयात केला. मग टायगर श्रॉफवर गोळीबार करणारे हल्लेखोर कुठून आले? उत्तरप्रदेशमधून! लॉरेन बिश्नोई हा गँगस्टर गुजरातच्या साबरमती जेलमध्ये ढोकळा खात बसला आहे.

Uddhav Thackeray Dussehra Rally
Uddhav Thackeray Dasara Melava 2026: "भगवा लाल किल्ल्यावर फडकवायचाय, कितीही दरोडेखोर येऊ देत..."; उद्धव ठाकरेंनी तोफ डागली!

राज्याच्या गृहमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी बिश्नोईला पकडून आणावे, असे आव्हान आव्‍हान देत उद्धव म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला शहरी नक्षलवादी बोलण्याची तुमची हिंमत कशी झाली? हे गृहमंत्री महाराष्ट्राला कलंक आहेत!

१३ कोटी नागरिकांचे नांव मतदार यादीतून वगळले. ते सगळे बांगलादेशी आहेत का.सैन्य दलातील एका महिला अधिकाऱ्याचे नाव यादीतून वगळले. देश वाचवायला ते सीमेवर लढत आहेत त्यांनी कोणते पुरावे दिले पाहिजेत. मतदार प्रक्रियेत घोटाळा करणाऱ्या ज्ञानेश कुमार हे एक प्यादे आहे. सत्ताधारी मोदी आणि शहा यांचा जीव ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यात आहे..असे ते म्हणाले.

पुस्तके वगळण्याचा डाव

विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून काही पुस्तके सरकारला वगळायची आहेत. हा त्यांचा डाव आहे. एक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानबाबतचे पुस्तक आहे आणि दुसरे महात्मा फुले यांचे जातीपाती बाबतचे एक पुस्तक आहे.

कोणीतरी या पुस्तकाबाबत ट्वीट केले म्हणून पंतप्रधान कार्यालयाने ही पुस्तके वगळण्याबाबत अहवाल द्या असे आदेश विद्यापीठांना दिले आहेत. जातिव्यवस्था नासविण्याचे काम हे सरकार करत आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणात धर्म आणि धर्माचे राजकारण आणले पण त्यात ८० टक्के समाजकारण होते. आणि २० टक्के राजकारण. हिंदुत्व वाचवण्याचे काम शिवसेनाप्रमुखांनी केले. पण आताचा राजा हा सत्तेसाठी हिंदुत्व वापरत आहे. आम्ही देशाभिमानी हिंदु आहोत. देशभक्त मुस्लिमांचा हिरवा रंग असेल, दलितांचा निळा रंग असेल पण मोदी शहा यांचे सरकार हे तिरंग्यातील रंग वेगळे करू पहात आहे, असा आरोप उद्धव यांनी केला.

ही सरकारची सभ्यता?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा मोहन भागवत यांच्याशी आमचे भांडण नाही. लढ के लिए आझादी..ही संघाची घोषणा आहे. पण देशाची तरुण पिढी तिरंगा झेंडा फडकवत आहे, त्यांना पोलीस मारहाण करतात.

जिथे लोकशाही बदनाम केली, मते लुटली, तेथे आणखी काय बाकी आहे? दाद मागण्याचे सर्व दरवाजे बंद झाले आहेत. मग तरुण चिडून रस्त्यावर येणार आले तर त्यांना गुंड ठरविणार का? पोलिसांनी जेन झी वर अमानुष अत्याचार केले. दुसरीकडे सरसंघचालक भागवत म्हणतात की आंदोलनात सभ्यता हवी.

सरकारच्या आदेशाने पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या तरुण-तरुणींना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याला सरकारची सभ्यता म्हणायची का, असा सवाल त्यांनी केला. जेन झीला तुम्ही झुरळ आणि दिमागी नक्षल असे म्हटले. पण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात याच वयाच्या पिढीने भाग घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचे पोट जेन झीच्या वयात फाडले होते, याची आठवण उद्धव यांनी करून दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news