

मुंबई : आम्ही अस्सल मराठी बोलणारे, कडवट आणि कट्टर देशभक्त हिंदू आहोत. आज हिंदुत्वाच्या आडून हळुवारपणे एक सांस्कृतिक आक्रमण आपल्यावर होत आहे. हिंदी सक्ती असेल किंवा आता धोक्यात आलेला जय महाराष्ट्रचा उद्घोष. अनेक वेगवेगळे भगवे इथे फडकायला लागले आहेत, वेगवेगळ्या घोषणा सुरू झाल्या आहेत, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केला. मात्र, आम्ही उच्चरवाने आमचा घोषणा देऊ आणि सांस्कृतिक आक्रमण करायाला आलेल्यांना जागेवर गाडू, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे म्हणाले, या महापालिका निवडणुकीत मनासारखा निकाल लागला नसला, थोडक्यात निसटता पराभव झाला असला तरी आपण चांगली लढत दिली. यावेळी वेळीच दुबार मतदार शोधले नसते तर निकाल वेगळाच लागला असता. पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा निर्धार बोलून दाखवतानाच जे सोडून गेले त्यांच्यामुळे पक्षाला नवी पालवी फुटली आहे, जी सडलेली पाने होती तीच झडली. ते एका अर्थाने चांगले झाले.
शिवसेनेने काय केले, असे विचारणाऱ्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही. मात्र, शिवसेना नसती तर यांना महापालिका आणि मंत्रालय दिसले नसते, हेच शिवसेनेचे कर्तृत्व आहे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपला व शिंदे सेनेला लगावला. जेव्हा विजय अशक्य असतो तेव्हाच आपला शत्रू गद्दारीचा आश्रय घेतो. पण, शिवसेना नावाच्या झाडावर ज्या कुऱ्हाडीने घाव घालायचा प्रयत्न झाला त्या कुऱ्हाडीचा दांडा, त्याचे लाकूड आपलेच होते, याचे शल्य जास्त आहे.
घाव घालणारे दोन व्यापारी आपल्याच लोकांचा वापर करत असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजप नेतृत्वावर निशाणा साधला.मुंबईत आपण चांगली लढत दिली, असे देशभरात बोलले जात आहे. शिवसेना संपवायला, ठाकरे नाव संपवायला आलेल्यांना रोखले आहे, असे सांगतानाच तुम्ही मत विकत घ्याल, पण मन कसे विकत घेणार? जिवंत मने शिवसेनेच्या भगव्यासोबत आहेत. एकवेळ मेलो तरी चालेल, पण दोन व्यापाऱ्यांची गुलामी करणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
रक्तरंजित इतिहासात पाठीवर केलेले वार गद्दारांचे जास्त आहेत, याचे शल्य आहे. मुंबईवरचा भगवा उतरवून काय मिळवलेत, असा प्रश्न करतानाच उद्धव म्हणाले, मुंबईतली आपली ताकद कमी झालेली नाही. आपण मुंबईचा आपला गड शाबूत राखला आहे. आता, मुंबईकरांनी आणि इतरांनीही विचार करायला हवा की आपल्याला जपणारे कोण आहेत, अडीअडचणीच्या काळात मदत करणारे कोण आहेत आणि आपला व्यापार करणारे कोण आहे. जे आपला सौदा करायला आले ते आपल्या मदतीला कसे धावून येतील याचा विचार लोकांना केला पाहिजेे.
श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालात भाजपचा एकही नेता दोषी ठरलेला नाही किंवा त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही, अशी भाजपची अवलाद आहे. प्रत्येक वेळी संघर्ष, आंदोलन किंवा आपत्ती आली की सर्वात आधी रस्त्यावर उतरतो तो शिवसैनिक असतो. मात्र प्रत्यक्ष कामानंतर काहीजण केवळ छायाचित्रांसाठी पुढे येतात, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.