

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवाजी पार्कवर आयोजित दीपोत्सव कार्यक्रमाला यंदा प्रथमच उद्घाटक म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हजेरी लावणार आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या भाऊबंदकीमधील वाद जवळपास मिटला असून भाऊबंदकी अजूनच घट्ट झाल्याचे दिसून येत आहे.
उद्धव व राज ठाकरे एकत्र यावेत, यासाठी खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही अनेक प्रयत्न केले. पण ठाकरे कुटुंबातील भाऊबंदकीचा वाद काही मिटला नाही. उलट बाळासाहेब यांच्या निधनानंतर वाद अजूनच विकोपाला गेला. त्यामुळे हे दोन भाऊ एकत्र यावे यासाठी त्यांच्या मामानेही प्रयत्न केला. मराठी माणसाने ही दोन्ही भाऊ एकत्र यावेत, अशी इच्छा प्रकट करूनही ते शक्य झाले नव्हते. अखेर राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्ती करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे दोघा भावांची सूत जुळू लागली. हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही भाऊ एका व्यासपीठावर आले. त्यानंतर दोघा भावांच्या वरचेवर भेटी होऊ लागल्या. अगदी दोघा भावांची कुटुंब एकमेकांच्या घरीही गेले. त्यामुळे ठाकरे कुटुंबातील भाऊबंदकीचा वाद हळूहळू कमी होत गेला. आतापर्यंत पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दोघांपैकी एकानेही हजेरी लावली नव्हती. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे येतील, असे बोलले जात होते. पण राज यांनी दसरा मेळाव्याला जाणे टाळले.
यंदा दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्क येथे मनसेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या दिपोत्सव कार्यक्रमाला प्रथमच उद्घाटक म्हणून उद्धव ठाकरे हजेरी लावणार आहेत. तशी सोशल मीडियावर जाहिरातही होऊ लागली आहे. मनसेच्या या दीपोत्सवामध्ये आतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे व महायुतीतील अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे अथवा शिवसेनेतील अन्य पदाधिकाऱ्यांनी कधीच हजेरी लावली नाही. पण आता पक्षप्रमुखच मनसेच्या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून जाणार असल्यामुळे या कार्यक्रमांमध्ये शिवसेना मनसे युतीचे दर्शन घडणार आहे. उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून यावे म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत दोघे भाऊ एकत्रित येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
मनसेच्या दिपोत्सवामध्ये उद्धव ठाकरे सहकुटुंब सहभागी होणार आहेत. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुटुंबीयांकडून होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे प्रथम सहित असल्यामुळे या सोहळ्याकडे केवळ शिवसैनिक मनसैनिकांचेच लक्ष लागले नसून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे.