

मुंबई : उद्धव-राज ठाकरे या बंधू भेटीमुळे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मराठी मते एकवटून याचा फायदा ठाकरे बंधूंना होईल, असे वाटत होते; परंतु दोन्ही बंधूंना या भेटीचा राजकीय फायदा झाला नाही. उद्धव ठाकरे यांचे काही प्रमाणात मुंबईत अस्तित्व दिसून आले असले तरी, मनसेला उद्धव ठाकरे सेनेचा टेकू असूनही स्वतःचा करिष्मा दाखवता आला नाही.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने का होईना, विखुरले गेलेले ठाकरे कुटुंब एकत्र आले. एकमेकांच्या विरोधात वक्तव्ये करणारे उद्धव-राज हे दोन्ही भाऊ पालिका निवडणुकीत एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसून आले. त्यामुळे मराठी मतांची होणारी विभागणी थांबेल असे वाटत होते. काही प्रमाणात ही विभागणी थांबली. त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला झाला. पण 2017 मध्ये 8 टक्के मते घेणाऱ्या मनसेला या निवडणुकीत भावाची साथ असतानाही करिष्मा दाखवता आला नाही.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनसे युती असल्यामुळे मनसेच्या जागा वाढतील, असे वाटत होते. परंतु मनसेने दोन अंकी आकडाही गाठला नाही. त्या तुलनेत उद्धव सेनेला चांगले यश मिळाले आहे.
2017 च्या तुलनेत ठाकरे सेनेची कामगिरी फारशी चांगली दिसत नसली तरी, भाजपाच्या आक्रमक राजकीय डावपेचांसमोर ठाकरे सेनेने तेवढेच तगडे आव्हान दिले. त्यामुळे ठाकरे सेनेने 57 प्रभागांत आपले निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे. 2017 मध्ये शिवसेना स्वतंत्र लढूनही 84 जागा जिंकल्या होत्या. यावेळी मनसेसोबत निवडणूक लढवूनही 27 जागा कमी झाल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे ठाकरे सेनेला फारसा फरक पडत नसल्याचे बोलले जात होते, परंतु ठाकरेंच्या नगरसेवकांची कमी झालेली संख्या लक्षात घेता, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ठाकरे यांना आव्हान असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेमुळे ठाकरे यांचे नगरसेवक घटल्याचे सिद्ध होते. त्याचवेळी 40 हून अधिक विद्यमान नगरसेवक उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे सेनेत आले आणि तरीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपले वर्चस्व मुंबईत निर्माण करता आले नाही. संयुक्त शिवसेनेची 2017 सालची विजयी संख्या 84 होती. त्या संख्येच्या निम्म्याही जागा शिंदे यांना राखता आल्या नाहीत. शिंदे सेना 30 च्या आतच अडकून पडली. याउलट प्रचंड संख्येने आजी-माजी नगरसेवक सोडून गेलेले असतानाही उद्धव ठाकरेंनी अर्धशतक पार झेप घेतली व मुंबईच्या राजकारणात आपले आव्हान कायम ठेवले.