

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील पाच महापालिकांपैकी छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नांदेड या तीन महापालिकांत भाजपाने सर्वाधिक व बहुमतासाठीआवश्यक जागा जिंकत सत्तासूत्रे आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. लातूर, परभणीत मात्र भाजपाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. परभणीत उबाठाने तर लातूरला काँग्रेसने भाजपची घोडदौड रोखली.
राज्याच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या असलेल्या छत्रपती संभाजीनगरात भाजप 30 ते 35 जागांपर्यंत मजल मारेल, अशी अपेक्षा असताना पक्षाने सर्व्हे आणि राजकीय निरीक्षकांचे अंदाज चुकवित 115 पैकी 57 जागांवर विजय मिळविला. संभाजनीगरात भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. असे असतानाही मतदारांनी भाजपाला कौल दिला हे विशेष. भाजपचे नेते अनिल मकरीये, समीर राजूरकर, माधुरी अदवंत, राजू वैद्य, सविता कुलकर्णी, सुरेंद्र कुलकर्णी, शिवाजी दांडगे आदी विजयी झाले आहेत.
शिंदे सेनेने 14 जागा जिंकल्या असून, उमेदवार व मंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट, पुत्र सिद्धांत, माजी महापौर त्र्यबंक तुपे, अनिता घोडेले, ऋषीकेश जैस्वाल, राजेंद्र जंजाळ हे विजयी झाले. उबाठाने सहा जागी बाजी मारली असून, रशीद मामू हे विजयी झाले तर अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे पराभूत झाले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार नवीनसिंग ओबेरॉय यांनी माजी उपमहापौर संजय जोशी यांना अल्पशा मतांनी पराभूत केले.
जालन्यात सुस्पष्ट कौल : जालना शहराला महापालिकेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झाली. या निवडणुकीत 65 पैकी 41 जागांवर विजय मिळवित भाजपने वर्चस्व राखले आहे. माजी मंत्री रावसाहेब दानवे, कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही निवडणूक लढविली होती. शिंदे सेनेचे नेते आ. अर्जुन खोतकर यांनी प्रयत्नांची पराकष्ठा करूनही या पक्षाला केवळ 12 जागा, तर काँग्रेसला 9 ठिकाणी विजय मिळाला आहे. जालना हा शिवसेनेचा बालेकिल्ला ओळखला जात असे. काँग््रेासचे कैलास गोरंट्याल आणि सेनेचे अर्जुन खोतकर असाच सामना येथे होत असे. परंतु विधानसभा निवडणुकीनंतर गोरंट्याल यांनी भाजपत प्रवेश केल्यामुळे याठिकाणी भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे.