

मुंबई : लहान मुलांमध्ये टाइप-१ मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, वाडिया रुग्णालयात दर पाच दिवसांनी एका नव्या बालरुग्णामध्ये या आजाराचे निदान होत आहे. सध्या रुग्णालयात टाइप-१ मधुमेह असलेल्या १,३०० हून अधिक मुलांवर उपचार सुरू असून, त्यापैकी १,२०० पेक्षा अधिक मुले नियमित फॉलो-अपसाठी येतात.
रुग्णालयात आठवड्यातून एकदा विशेष मधुमेह ओपीडी भरवून बाल एंडोक्राइनोलॉजिस्ट, आहारतज्ज्ञ, परिचारिका आणि मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने मुलांना व पालकांना उपचार, आहार आणि आजार व्यवस्थापनाचे मार्गदर्शन केले जाते.
रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालिका डॉ. सुधा राव यांनी सांगितले की, टाइप-१ मधुमेह हा चुकीच्या आहारामुळे नव्हे, तर ऑटोइम्यून विकारामुळे होतो. या मुलांना आयुष्यभर इन्सुलिन, नियमित रक्तशर्करा तपासणी आणि वैद्यकीय देखरेखीची गरज असते. उपचारांबरोबरच मानसिक आधार आणि पालकांचे प्रशिक्षणही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
या आजारावरील उपचारासाठी एका मुलामागे दरवर्षी सुमारे ७० ते ९० हजार रुपये खर्च येत असल्याने अनेक कुटुंबांवर मोठा आर्थिक ताण येतो. काहीजण उपचारात खंड पाडतात किंवा इन्सुलिनचे डोस कमी करतात, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.
मोबाईल ॲप विकसित करणार
रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले की, वाडिया रुग्णालयात उपचारांसह आर्थिक मदत, ग्लुकोज मॉनिटर, इन्सुलिन पंप आणि आधुनिक इन्सुलिन डिलिव्हरी प्रणाली उपलब्ध करून दिली जाते. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मोबाईल ॲप विकसित करण्यात येत असून, त्याद्वारे रुग्ण आणि पालकांना सातत्याने मार्गदर्शन केले जाणार आहे.