

मुंबई : मुंबई शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या तलावापैकी ठाणे जिल्ह्यातील तानसा तलाव बुधवारी सकाळी ८.५१ वाजता ओसंडून वाहू लागला. त्यामुळे मुंबईकरांची पाणी टंचाईची चिंता लवकरच मिटणार आहे.
तलावाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे तलावातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. तळ गाठलेला तानसा तलाव ओसंडून वाहू लागला असून मोडक सागर तलावही कधीही वाहू शकतो. तानसा तलावाची कमाल पाणी साठवण्याची क्षमता १४,५०८ कोटी लीटर (१४५,०८० दशलक्ष लीटर) एवढी आहे.
२०२५ मध्ये तानसा २३ जुलैला सायंकाळी ५.४० च्या सुमारास ओसंडून वाहू लागला होता. यावेळी एक दिवस अगोदरच हा तलाव वाहू लागला. या तलावातून मुंबईला दररोज ४५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. लवकरच पाणी कपात मागे घेण्याची शक्यता आहे.
पाणीसाठा ६२ टक्केवर
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा ६२ टक्केवर पोहचला आहे. शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणारा भातसा ५७ टक्के भरला आहे. समाधानकारक पाऊस पडत असून पाणी साठ्यात वाढ होऊ लागली आहे. गेल्या चार दिवसांत पाणीसाठ्यात १ लाख ६० हजार दशलक्ष लिटरपेक्षा जास्त वाढ झाली आहे. निम्म्या मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या भातसा तलावातील पाणीसाठ्यातही वाढ होत असून या तलावातील पाणीसाठा ४ लाख १० हजार दशलक्ष लीटरवर पोहोचला आहे. मोडक सागरही ९० टक्के भरला असून पाऊस सुरूच राहिल्यास हा तलावही ओसंडून वाहू लागेल.
तुळशी तलावात सर्वाधिक २५६८ मिमी पाऊस
तलावाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक २५६८ मिमी पाऊस नॅशनल पार्कमधील तुळशी तलावात पडला आहे. विहार तलावतही १९११ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ठाणे जिल्ह्यात असणाऱ्या चार तलावांपैकीच सर्वात कमी म्हणजे १२८७ मिमी पाऊस मध्यवैतरणा तलावात झाला आहे. मोडक सागर व तानसा तलाव क्षेत्रात सरासरी १७०० मिमी पाऊस झाला.
पाणीसाठ्याची टक्केवारी व आतापर्यंत झालेला पाऊस
अप्पर वैतरणा -३९ टक्के (१४५५ मिमी)
मोडक सागर -९० टक्के (१७०६ मिमी)
तानसा -९७ टक्के (१७३५ मिमी)
मध्य वैतरणा -५३ टक्के (१२८७ मिमी)
भातसा -५७ टक्के (१५११ मिमी)
विहार -१०० टक्के (१९११ मिमी)
तुळशी -१०० टक्के (२५६८ मिमी)
जल अभियंता विभागात पेढ्याचे वाटप
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी महत्वाचा तानसा तलाव वाहू लागल्यामुळे पालिकेच्या जल अभियंता विभागातील कर्मचारी आपल्या खात्यामध्ये पेढे वाटून आपला आनंद व्यक्त करतात. गेल्या कित्येक वर्षापासून ही प्रथा परंपरा सुरू आहे.