

मुंबई : यंदाच्या दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाने अपेक्षित मर्यादा पाळल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला असला तरी या फटाक्यांमध्ये असणाऱ्या घातक रसायनांवर कोणाचेही नियंत्रण नाही. फटाक्यांच्या वेष्टनावर छापलेल्या प्रमाणापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात या फटाक्यांमध्ये घातक रसायने आहेत. तसेच बंदी असलेल्या रसायनांचाही वापर करण्यात आला आहे.
बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या 25 फटाक्यांची चाचणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाऊंडेशन यांनी 16 ऑक्टोबरला केली होती. यावेळी सर्व फटाक्यांचा आवाज विहीत मर्यादेत असल्याचा आवाज प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला. यामुळे यंदाच्या दिवाळीत ध्वनी प्रदूषणापासून मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र आवाज फाऊंडेशनने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या निकालानुसार या फटाक्यांपासून वायू प्रदूषणाचा धोका मोठा आहे.
आवाज फाऊंडेशनच्या सुमायरा अब्दुलाली यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेरियम या घातक रसायनावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली असूनही हे रसायन फटाक्यांच्या निर्मितीसाठी वापरण्यात आले आहे. राजूकन्नाच्या फुटबॉल डबल धमाका या फटाक्यामध्ये 0.499 टक्के, विनियागा सोनीच्या मास्टर ऑफ मॅजिकमध्ये 1.308 टक्के बेरियम आहे. याशिवाय, ग्रीन बीज, जॅकी चॅन, अल्टिमेट ग्लिट्झ, वंडरफुल हेवन 60 शॉट्स, रेडर्स ऑफ दर लास्ट, गोल्ड स्पार्कल 30, स्पिनर स्पेशल, ट्विंकल स्काय, कलर साऊंड, कलर स्पार्कल नं. 100 या फटाक्यांमध्येही बेरियम आहे.
फटाक्यांच्या वेष्टनावर त्यात वापरण्यात आलेल्या रसायनांचे प्रमाण नमूद करण्यात आले आहे. मात्र नमूद करण्यात आलेल्या प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात घातक रसायने वापरण्यात आल्याचे चाचणीदरम्यान आढळले. काही रसायने फटाक्यांमध्ये आढळली असली तरी त्यांची माहिती वेष्टनावर छापण्यात आलेली नाही. यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
ईद, गणेशोत्सव, नववर्ष, इत्यादी विविध सण-उत्सवांना वर्षभर फटाके फोडले जातात; मात्र दिवाळीदरम्यान मोठ्या प्रमाणावर आणि केंद्रित पद्धतीने फटाके फोडले जातात. फटाक्यांचा नवीन माल हा दिवाळीपूर्वीच बाजारात येतो. यावर्षीही अनेक घातक रसायनांनी युक्त फटाके बाजारात उपलब्ध आहेत. परिणामी, हवेचा दर्जा खालावतो आहे. दरवर्षी फटाक्यांची चाचणी केली जाते. पुढील वर्षी दिवाळी येणार आहे, हे माहीत असते. तरीही बंदी घातली जात नाही. इतक्या वर्षांच्या विरोधानंतर आणि जनजागृतीनंतरही शासनाला फटाक्यांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रोखण्यात अपयश आले आहे.
सुमायरा अब्दुलाली, आवाज फाऊंडेशन