

नवी मुंबई : धनत्रयोदशीपासून सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात दररोज वाढ होत असताना मंगळवारी लक्ष्मीपूजनाच्या मूहूर्तावर मात्र सोने प्रति तोळे 3 हजार रुपयांनी स्वस्त झाले. चांदीही किलोमागे 5 हजार रुपयांनी घसरली.
लक्ष्मीपूजनानिमित्त मंगळवारी मुंबईतील सराफा बाजार बंद होता. तथापि पुणे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजी नगरसह राज्यभरातील सराफा बाजारात मोठी उलाढाल झाली. जळगाव सुर्वणनगरीतील आर.सी.बाफना ज्वेर्लसचे मालक सुशील बाफना यांनी पुढारीला सांगितले की, मंगळवारी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोन्याचा दर सकाळी 1 लाख 29 हजार रुपये प्रतितोळ होता. तोच संध्याकाळी पुन्हा घसरला आणि 1 लाख 28 हजार रुपये तोळे झाला. म्हणजे सोमवारी नरकचतुर्दशीला 1 लाख 31 हजार रुपये प्रतितोळा असलेले सोने मंगळवारी दुसऱ्याच दिवशी 3 हजार रुपयांनी स्वस्त झाले. चांदीतही सोमवारच्या तुलनेत 5 हजार रुपयांची घसरण झाली. सोमवारी 1 लाख 60 हजार रुपये किलो चांदीचा दर होता, तो लक्ष्मीपूजनाला 1 लाख 55 हजार रुपये एवढा होता.
हजार कोटी उलाढालीचा अंदाज
पुण्यातील रांका ज्वेलर्सचे मालक फत्तेचंद रांका यांनी सांगितले की, यंदाच्या दिवाळीत सराफा बाजार तेजीत आहे. ग्राहकांची मागणी अधिक आहे. नवीन डिझाईनच्या दागिने खरेदीला मोठी मागणी आहे. सोने महागले तरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही ग्राहकांची प्रचंड गर्दी होती. पुणे, नाशिक आणि जळगावसह उर्वरित महाराष्ट्रात लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोन्याची तब्बल 600 कोटींची उलाढाल झाली असावी. लक्ष्मीपूजन आणि पाडवा या दोन दिवसांत राज्यात 1 हजार कोटींची सोन्याची खरेदी होण्याचा अंदाजही रांका यांनी व्यक्त केला.
पाडवा मुहूर्त :
सकाळी 6.36 ते 8.03 लाभ, सकाळी 8.04 ते 9.30 अमृत, सकाळी 1.57 ते दुपारी 12.24 शुभ, दुपारी 3.18 ते सायं. 4.45 चल आणि सायं. 4.45 ते 6.10 लाभ चौघडीमध्ये वहीपूजन, वहीलेखनास उत्तम मुहूर्त.
कार्तिक शुक्ल प्रतिपदा, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा सण आहे. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस आहे. या दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी करतात. तसेच, शुभकार्याचा प्रारंभ करतात. या दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीला भेटवस्तू देतो. या दिवशी विक्रम संवत 2082 पिंगलनाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. याच दिवशी महावीर जैन संवत 2552 चा प्रारंभ होत आहे. याच दिवशी अन्नकूट आणि गोवर्धन पूजा करावयाची आहे.
दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक