मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये वायू प्रदूषणामध्ये सातत्याने वाढ होत आहे. वडाळ्यामध्ये प्रदूषणाने टोक गाठले आहे. मंगळवारी येथे 501 इतका हवा गुणवत्ता निर्देशाक (एक्यूआय) नोंदला गेला. गोवंडी येथील हवा सुद्धा खराब आहे.
एक्यूआय संकेतस्थळावरील माहितीनुसार, मंगळवारी मुंबईचा सरासरी एक्यूआय 188 इतका होता. हा एक्यूआय वायू प्रदूषणाच्या आरोग्यास हानिकारक हवेच्या कॅटेगरीमध्ये मोडतो. हवेतील धूलिकणांचे प्रमाण चिंताजनक असून पीएम 10 आणि पीएम 2.5 चे प्रमाण अनुक्रमे 126 आणि 102 मायक्रो-ग्रॅम्स पर क्युबिक मीटर इतके नोंदले गेले.
मुंबई शहर आणि उपनगरांमधील प्रमुख ठिकाणांचा आढावा घेतल्यास वडाळा येथील दोस्ती एकर्स परिसरात पाचशेहून अधिक एक्यूआयची नोंद झाली. गेल्या आठवडाभरात नोंदला गेलेला हा सर्वाधिक एक्यूआय आहे. 301हून अधिक एक्यूआय हा वायू प्रदूषणाच्या आरोग्यास प्रचंड घातक हवेच्या कॅटेगरीमध्ये मोडतो.
वडाळानंतर गोवंडी येथील शिवाजीनगर परिसर वायू प्रदूषणामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तिथे 208 इतका एक्यूआय होता. पश्चिम उपनगरांमध्ये प्रदूषण कायम असून चारकोप, मालाड (एक्यूआय-182) तसेच वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी), कांदिवली (पूर्व) आणि बोरिवली- पश्चिम (186) हे प्रदूषणाचे हॉटस्पॉट आहेत.
मुंबईतील प्रशासकीय यंत्रणेला अजूनही वायू प्रदूषणाच गांभीर्य उमगलेले दिसत नाही. केलेल्या उपाय योजना तोकड्या असल्यानेच वायू प्रदूषण सलग धोकादायक पातळीवर आहे.
प्रदूषणाचे हॉटस्पॉट
ठिकाण एक्यूआय
दोस्ती एकर्स (वडाळा) - 501
शिवाजीनगर (गोवंडी) - 208
चारकोप/मालाड - 182
बीकेसी/कांदिवली/बोरिवली - 186