

मुंबई/नवी दिल्ली: अवघ्या 19व्या वर्षी अहिल्यानगरचा देवव्रत महेश रेखे या तरुण वेदमूर्तीने 50 दिवस दोन हजार वेदमंत्रांचे अखंड म्हणजे दंडक्रम पारायण करून इतिहास घडवला. 200 वर्षांत हा विक्रम नोंदवणारा महेश भारताचा दुसराच आणि सर्वांत तरुण वेदमूर्ती ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही लक्ष वेदमूर्ती देवव्रतच्या या वेदपराक्रमाने वेधले. आणि मंगळवारी पंतप्रधानांनी त्याचे खास अभिनंदन केले.
विक्रमाशी मराठी नाते
देवव्रतनेे दंडक्रम पारायणम 50 दिवसांत पूर्ण करून 200 वर्षांत प्रथमच हा विक्रम महाराष्ट्राच्या नावे नोंदवला. ऐतिहासिक योगायोग असा की यापूर्वी दोनशे वर्षांपूर्वी नाशिकचे वेदमूर्ती नारायणशास्त्री यांनीच हा विक्रम नोंदवला होता. या दोन शतकांच्या दरम्यान नारायणशास्त्री विस्मृतीत गेले आणि देवव्रतने हे अत्यंत कठीण पारायणम पूर्ण करून इतिहासाला नवा उजाळा दिला. 12 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर असे 50 दिवस वल्लभराम शालीग्राम सांग्वेद विश्वविद्यालयात त्याने हे पारायणम पूर्ण करताच देव्रतला वेदमूर्ती म्हणून मानाची पगडी घालण्यात आली. आणि त्याच्या मनगटावर सोन्याचे कडे चढवले गेले.
शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यंदिनी शाखेचे 2000 मंत्र 50 दिवसांत कोणताही खंड न पाडता म्हणणे याला दंडक्रम पारायण असे म्हणतात. हे सर्व मंत्र मुखोद्गत म्हणायचे असतात. त्यातही उलट-सूलट आणि सलग क्रमाने ते विशिष्ट स्वरात व्याकरण, छंद आणि अचूक उच्चारांसह म्हणावे लागतात. शंकराचार्य दिवंगत चंद्रशेखरानंद सरस्वती ‘महापेरिया’ यांनी या प्रक्रियेचे वर्णन करताना म्हटले की, याच दंडकर्म पारायण पध्दतीने अलिखित वेध पिढ्यान्पिढ्या त्यांच्या मूळ स्वरूपात टिकू शकले.
दंडक्रम पारायणम ही 2000 मंत्रांची अत्यंत कठीण परीक्षा 50 दिवसांत पार करताना देवव्रतने एकही चूक केली नाही. आणि हेच या परीक्षेचे वैशिष्ट्य होय. वाराणसीच्या रामघाटावर चालणाऱ्या सांग्वेद विद्यालयात त्याची ही साधना अखेर फळाला आली. हे विद्यालय पंडित गणेश्वर शास्त्री द्रवीड चालवतात. 2024च्या लोकसभा निवडणुकीत हे गणेश्वर शास्त्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारीचे अनुमोदक होते.
देवव्रतची ही वेदपरीक्षा घेण्यास गणेश्वर शास्त्रींसह काशीचे नामवंत विदवान आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले वेदशास्त्री उपस्थित होते. देवव्रत हा मुळचा महाराष्ट्राच्या अहिल्यानगरचा आणि त्याच्या या दंडक्रम पारायणमचे श्रोता म्हणून भूमिका बजावणारे देवेंद्र रामचंद्र गढीकर हे अमरावतीचे!
मोदींकडून कौतुक
एक्स वरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले की, केवळ 19 वर्षे वयाच्या वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी केलेल्या या कार्याची आठवण येणाऱ्या अनेक पिढ्या ठेवतील. भारतीय संस्कृतीविषयी प्रेम असणाऱ्या सर्वांना त्यांनी दंडक्रम पारायण पूर्ण केल्याबद्दल त्यांचा खूप अभिमान आहे. दंडक्रम पारायणात अनेक वैदिक मंत्र व ऋचा अचूक म्हणणे अपेक्षित असते. आपल्या उच्च गुणवत्तेच्या गुरु परंपरेचे हे एक अद्वितीय उदाहरण आहे. हे अद्वितीय कार्य काशीच्या पवित्र नगरीत पार पडले याचा काशी नगरीचा खासदार म्हणून मला खूप आनंद आहे. देवव्रत महेश रेखेंच्या कुटुंबीयांना, तसेच त्यांच्या पाठीशी असलेल्या देशभरातील साधू, संत, पंडित तसेच अनेक संस्थांना माझा प्रणाम!
देवव्रत रेखेचे कौतुक करताना श्रृंगेरी मठाने म्हटले आहे की, देवव्रतचे दंडक्रम पारायणम 50 दिवस अखंड, बिनचूक चालले. दंडक्रम म्हणजे वेदोच्चरांचा मुकुट म्हटले जाते. कारण वेदमंत्रांची अत्यंत जटील स्वररचणा, कठीण उच्चर आणि तितकेच कठीन क्रम. यामुळेच आजवरच्या इतिहासात फक्त तीन वेळा दंडक्रमाची यशस्वी नोंद होवू शकली. त्यातही हे पारायणम बिनचूक पूर्ण करण्यासाठी देवव्रतने सर्वांत कमी वेळ घेतला.
ऐतिहासिक योगायोग असा की यापूर्वी दोनशे वर्षांपूर्वी नाशिकचे वेदमूर्ती नारायणशास्त्री यांनीच हा विक्रम नोंदवला होता.