मुंबई : प्रभाग रचनेची नोटीस जारी करण्याचा महापालिका आयुक्तांना अधिकारच नाही, असा दावा महापालिकेच्या प्रभाग रचनेला आक्षेप घेणाऱ्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येेष्ठ वकील ॲड.अनिल अंतुरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात केला.
मुंबई,ठाणे, नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेवर आक्षेप घेणाऱ्या याचिका दाखल झाल्या आहेत. अन्य काही पालिकांच्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर व न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी ॲड. अनिल अंतुरकर यांनी पालिका आयुक्तांनी जारी केलेल्या नोटिसीलाच जोरदार आक्षेप घेतला.
आयुक्तांना अशा प्रकारे नोटीस जारी करण्याचे अधिकार नाहीत. कायद्यात अशी तरतूद नाही, असा दावा केला. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना केल्यानंतर त्या आधारावर आगामी निवडणुकांसाठी प्रभाग रचना करा, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले होते.
या आदेशाची अंमलबजावणी न करता राज्य शासनाने आगामी महापालिका निवडणुकांसाठी नव्याने प्रभाग रचना केली. ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली असल्याचा दावा ॲड. अंतुरकर यांनी केला. मंगळवारी यावरील सुनावणी अपूर्ण राहिल्याने खंडपीठाने ती उद्या निश्चित केली आहे.