

नवी मुंबई : सध्या पाऊस जोर धरत असताना पावसाळी दिवसांत निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटनस्थळी निसर्गप्रेमींची गर्दी होताना दिसत आहे. घणसोली येथील गवळीदेव पर्यटनस्थळाचा विकास करण्यात येत असल्याने या ठिकाणी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांनी त्यांचा मोर्चा नवी मुंबईतील सुलाई देवी येथील निसर्गरम्य ठिकाणी व इलठण पाडा येथील ब्रिटीशकालीन धरणाकडे वळवला आहे.याठिकाणी सध्या पर्यटकांची गर्दी होवू लागली आहे.
इलठण पाडा येथील ब्रिटीशकालीन धरण परिसरात पर्यटनांचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्यांमध्ये काही अतिउत्साही पर्यटकही असतात. त्यांच्याकडून करण्यात येणाऱ्या अतिउत्साही प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी स्थानिक पोलीसांनीही सध्या विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. पर्यटनाच्या ठिकाणी मद्यप्राशन केल्यास त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी असणाऱ्या मद्यपींमुळे तिथे कुटुंबासह बच्चेकंपनीला घेऊन येणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नवी मुंबईतील गवळी देव, सुलाई देवी, इलठण पाडा येथील ब्रिटीशकालीन डॅम येथे अनेकदा पावसाळ्यात अपघात होण्याच्या घटना घडल्या असून त्यामध्ये जिवितहानी होण्याचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे मान्सूनमध्ये पोलीसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते. पाण्याच्या ठिकाणी सेल्फी काढताना कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलीसांतर्फे पर्यटकांना करण्यात येत आहे.
इलठण पाडा येथील ब्रिटीशकालीन धरणात उतरण्यास सक्त मनाई असून पोलीसांनी सुट्टीच्या दिवशी बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ब्रिटीशकालीन डॅमच्या ठिकाणी पोलीसांकडून पर्यटकांसाठी सुचना फलक लावण्यात येणार असल्याचेही सांगितले.
गवळी देव परिसरात काम सुरू असल्यामुळे पर्यटकांसाठी प्रवेशबंदी आहे. जर कोणी त्या ठिकाणी गेला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सुलाई देवी डोंगर परिसर व इलठण पाडा येथील ब्रिटीशकालीन धरण या ठिकाणी उघड्यावर मद्यप्राशन केल्यास तसेच सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी कडक पहाराही ठेवण्यात येणार आहे.
देवीदास कठाळे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रबाळे एमआयडीसी