

नवी मुंबई : इमारतींच्या पुनर्विकासामुळे वाढत चाललेले नागरीकरण, एमआयडीसीत विकसित होत असलेले आयटी हब आणि नव्याने सुरू झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबईतील रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढला आहे. परिणामी नागरिकांना प्रत्येक दिवशी वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. वाहतूककोंडीतून नवी मुंबईकरांची सुटका करण्यासाठी ठाणे-बेलापूर मार्गावर तीन उड्डाणपूल तसेच पामबीच रोडवर किल्ले गावठाण येथे दुहेरी भुयारी मार्ग तयार करण्याच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे. त्यासाठी 85 0 कोटींचा खर्च होणार असून तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावर अनेक उड्डाणपूल उभे राहिले असले तरी या मार्गावर दररोज मोठी वाहतूककोंडी होते. नवी मुंबईतून मुलुंडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना ऐरोलीमध्ये ताटकळत थांबावे लागते. तुर्भे स्टोअर्स भागातही वाहने मुंगीच्या वेगाने मार्गक्रमण करतात. त्यामुळे या मार्गावर रबाळे, पावणे आणि तुर्भे भागात उड्डाणपूल उभे करण्याचा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक यांनी आज महासभेत मांडला. या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे.
पामबीच मार्ग बेलापूर येथील किल्ले गावठाण चौक चौक वाहतूककोंडीमुक्त करण्यासाठी दुहेरी भुयारी मार्ग तयार करण्याचे नियोजन करण्यात आले. हा भुयारी मार्ग नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोर पामबीच मार्गाला समांतर असणार आहे. त्यामुळे बेलापूरकडे जाणाऱ्या वाहनांचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे.
नवी मुंबई विमानतळावरून सध्या देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. दररोज जवळपास शंभरच्या आसपास विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग होत आहे. त्यामुळे नवी मुंबईत वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाल्यानंतर वाहनांची संख्या आणखी वाढणार आहे.
हायब्रीड ॲन्युलिटी मॉडेल पद्धतीने उभारणी
नव्याने तयार करण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांची उभारणी हायब्रीड ॲन्युलिटी मॉडेल यापद्धतीने करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. या पद्धतीत महापालिका 30 टक्के रक्कम ठेकेदाराला बांधकाम कालावधीत देणार असून 70 टक्के रक्कम ठेकेदारामार्फत उभारण्यात येणार आहे. नंतर ही 70 टक्के रक्कम वार्षिक हप्त्यांच्या स्वरूपात पालिकेकडून ठेकेदाराला दिली जाणार आहे.