Ashadhi Wari 2024 | ‍वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
Ashadhi Wari 2024
आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफ करण्यात आला आहे.file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क

आषाढी वारीसाठी (Ashadhi Wari 2024) पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. पंढरपूरला ३ जुलै ते २१ जुलै दरम्यान वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना पथकरातून सूट असणार आहे. याबाबतचा शासन आदेश आज बुधवारी (दि. ३) राज्य सरकारने जारी केला. दरम्यान, आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट दिली असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित वारी व्हावी यासाठी सर्व सुविधा वारकऱ्यांना देत आहोत. वारकऱ्यांना टोलमधून सूट दिलेली आहे. त्यामुळे वारकऱ्यांची या वर्षीची वारी सुरक्षित होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

Ashadhi Wari 2024
आषाढी वारीसाठी पंढरपूर रेल्वे सुरू

२०२४ च्या आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसेच भाविकांच्या व वारकऱ्यांसाठीच्या सोयी-सुविधा, त्यांच्या वाहनांना पथकरातून सूट देणे, तसेच वारी मार्गावरील रस्ते दुरुस्ती या विषयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची १४ जून रोजी बैठक झाली होती. या बैठकीतील चर्चेनुसार, ३ जुलै ते २१ जुलै दरम्यान पंढरपूरला जाणाऱ्या आणि परत येणाऱ्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांना पथकरातून सूट देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वाहनांना पास मिळणार

पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांना 'आषाढी एकादशी २०२४', गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करून आवश्यक त्या संख्येनुसार स्टीकर्स परिवहन विभाग, वाहतूक पोलिस आणि संबंधित आरटीओ यांच्याशी समन्वय साधून उपलब्ध करुन द्यावेत. सदरचे पास परतीच्या प्रवासाकरिता ग्राह्य धरण्यात येतील या प्रमाणे स्टीकर्स तयार करण्यात यावेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना गृह विभागाबाबत अवगत करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

सर्व पथकर नाक्यांवर स्वतंत्र पोलिस यंत्रणा ठेवावी. तसेच परिवहन विभागास देखील ज्यादा बसेस गाड्या सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Ashadhi Wari 2024
Nashik | आषाढी वारीतील सोयी-सुविधांसाठी दोन काेटींचा निधी

'इथे' मिळतील पास

राज्यभरातून पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व पथकर नाक्यांवर या कालावधीत पथकर माफी नसलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकरातून सूट द्यावी, असे ठरले आहे. तसेच राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गरजेप्रमाणे संबंधित पोलीस ठाणे यांच्याकडे या अनुषंगाने कूपन अथवा पास प्राप्त उपलब्ध करुन द्यावेत. राज्यभरातून पंढरपूरला जाणारे भाविक, वारकरी तसेच पालख्यांच्या वाहनांना संबंधित जिल्ह्यातील व शहरातील सर्व पोलिस ठाणे, वाहतूक विभाग, चौकी येथून भाविकांना पथकर माफ (टोल फ्री) पासचे वाटप करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news