

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ याच्या जुहू येथील कारवर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने सर्व ११ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लागू केला आहे. सक्षम प्राधिकरणाने २७ ऑक्टोबर रोजी मंजुरी दिल्यानंतर मोक्काची कलमे गुन्ह्यात वाढविण्यात आली. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींच्या अडचणी वाढल्या आहेत. खंडणी वसूल करणे, टोळीचा दबदबा निर्माण करणे आणि लोकांमध्ये दहशत पसरविणे, या उद्देशाने गोळीबार करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.
१८ ऑक्टोबर रोजी रात्री जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या कारवर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या घटनेत टायगरचा चालक आणि अन्य एक व्यक्ती जखमी झाली होती. या प्रकरणी १९ ऑक्टोबर रोजी जुहू पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) (खुनाचा प्रयत्न), ३(५) आणि शस्त्रास्त्र कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान या हल्ल्यामागे संघटित गुन्हेगारी टोळीचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार मोक्का कायद्याच्या कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) चा समावेश करण्यात आला आहे. या कलमांद्वारे संघटित गुन्हेगारी आणि त्यात सहभागी असलेल्यांविरुद्ध कठोर कारवाईची तरतूद आहे.
शस्त्रपुरवठा आणि कटाचा तपास
गोळीबारासाठी शस्त्रे कोठून आणण्यात आली, ती मुंबईत कोणी पोहोचवली, आरोपींना आर्थिक मदत कोणी केली आणि हल्ल्याचा कट कोणी रचला, याचा गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली असून, अनिल पंडित हा आरोपी अद्याप हवा आहे. त्याचे लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.
मोबाइलमधील व्हॉइस नोट्समधून शस्त्रपुरवठ्याच्या साखळीचा तपास
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील चार आरोपींच्या मोबाइलमधील व्हॉइस नोट्स गुन्हे शाखेच्या हाती लागल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. या व्हॉइस नोट्समधून शस्त्रे कोठून आणायची, ती कुठे ठेवायची आणि संबंधित व्यक्तींपर्यंत कशी पोहोचवायची, याबाबत चर्चा झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
एका आरोपीने दुसऱ्या आरोपीचा मोबाइल क्रमांक वेगळ्या नावाने सेव्ह केल्याचेही तपासात समोर आल्याचे सांगितले जाते. या डिजिटल पुराव्यांच्या आधारे आरोपींमधील संपर्क आणि शस्त्रपुरवठ्याची साखळी उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, मोबाइलमधील काही छायाचित्रे आणि हटवलेला डेटा पुन्हा मिळवून या कटातील अन्य सहभागींची माहिती मिळवण्यावर गुन्हे शाखेचा भर आहे.
मोक्का लागू झाल्याने काय बदलणार?
संघटित गुन्हेगारीच्या आरोपाखाली कठोर कायदेशीर कारवाई करता येते.
आरोपींच्या जामिनासाठी कायद्यातील कठोर अटी लागू होतात.
टोळीचे आर्थिक व्यवहार, शस्त्रपुरवठा आणि गुन्हेगारी जाळ्याचा तपास अधिक व्यापक होऊ शकतो.