

मुंबई : भारतीय भांडवली बाजाराच्या इतिहासात नवा सुवर्णअध्याय लिहीत ‘जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड’ने आपला विक्रमी आयपीओ यशस्वीरीत्या पूर्ण केला असून, कंपनीचे शेअर्स बुधवारी (दि. २८) राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारवर सूचीबद्ध होणार आहेत.
कंपनीने १०.३ लाख कोटी रुपयांच्या ऐतिहासिक मूल्यांकनावर १,११९ रुपये प्रतिशेअर भावाने २७ कोटी नवीन शेअर्स जारी केले आहेत. भारतीय शेअर बाजारात १० लाख कोटींपेक्षा जास्त मूल्यांकनावर आयपीओ आणणारी ही देशातील पहिलीच कंपनी ठरली आहे.
केवळ आयपीओच्या मूल्यांकनाचा विचार करता जिओ प्लॅटफॉर्म्स ही रिलायन्स इंडस्ट्रीज (१६.२ लाख कोटी), भारती एअरटेल (१२.२ लाख कोटी) आणि एचडीएफसी बँक (१०.६ लाख कोटी) यांच्यानंतर देशातील चौथी सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.
गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद आणि ग्रे-मार्केटमधील तेजी पाहता जिओ प्लॅटफॉर्म्सचे शेअर्स मोठ्या प्रीमियमवर सूचीबद्ध होण्याची दाट शक्यता आहे. जर शेअर्सचे लिस्टिंग २० टक्के प्रीमियमसह सुमारे १,३४० रुपयांवर झाले, तर कंपनीचे एकूण बाजार भांडवल १२.३ लाख कोटी रुपयांच्या पुढे जाईल. यामुळे जिओ प्लॅटफॉर्म्स थेट भारती एअरटेल आणि एचडीएफसी बँकेला मागे टाकून देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मूल्यवान कंपनी बनेल, तसेच पहिल्या व दुसऱ्या स्थानी एकाच समूहाच्या दोन कंपन्या असण्याचा नवा विक्रम प्रस्थापित होईल.
दरम्यान, केवळ आयपीओ मूल्यांकनाच्या आधारे रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ प्लॅटफॉर्म्स या दोन्ही कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल २७ लाख कोटी रुपयांच्या पार गेले असून, मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूह देशातील अव्वल औद्योगिक समूह ठरला आहे.
या कामगिरीने त्यांनी ३२ कंपन्यांचा समावेश असलेल्या टाटा समूहाला (२५.७ लाख कोटी) आणि ११ कंपन्यांचा समावेश असलेल्या अदानी समूहाला (१६.६ लाख कोटी) मागे टाकले आहे. जिओचे शेअर्स अपेक्षेप्रमाणे तेजीसह सूचीबद्ध झाल्यास रिलायन्स समूहाचे एकूण मूल्यांकन ३० लाख कोटी रुपयांचा ऐतिहासिक टप्पा गाठण्याच्या जवळ पोहोचेल.