

चंदीगड / मुंबई : बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली आहे. मात्र, याच्या तपासात सर्वात धक्कादायक आणि महत्त्वाचा दुवा म्हणून समोर आलेले नाव म्हणजे गँगस्टर अनिल पंडित. कुख्यात लॉरेन्स बिष्णोईच्या आंतरराष्ट्रीय टोळीचा परदेशातील हस्तक मानला जाणारा अनिल पंडित सध्या अमेरिकेत बसून भारतात गुन्हेगारी कारवाया घडवून आणत असल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
मुंबईतील जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या कारवर तिघांनी तीन राऊंड गोळ्या झाडल्या. यात टायगर थोडक्यात बचावला. पण त्याचा चालकासह दोघे जखमी झाले. याप्रकरणी कोटा येथून अटक करण्यात आलेले शूटर रेहान आणि हृतिक कुमार हे थेट अनिल पंडितच्या संपर्कात होते. प्राथमिक चौकशीनुसार, नेपाळमार्गे पळून जाण्याचा कट रचणाऱ्या या शूटरना अमेरिकेतून पंडितच दिशानिर्देश देत होता. हल्ल्यानंतर सोशल मीडियावर अनिल पंडित अनमोल बिष्णोई या नावाने जबाबदारी स्वीकारणारा संदेश प्रसारित करून ते अकाऊंट लगेच डिलिट करण्यात आले.
सब का नंबर आयेगा : पंडितची बॉलीवूडला खुली धमकी
हल्ल्यानंतर अनिल पंडितची एक ऑडिओ क्लिप समोर आली असून त्याने चित्रपटसृष्टीला थेट आव्हान दिले आहे. अभिनेता सलमान खानसोबत काम करणाऱ्या कलाकारांना इशारा देताना तो म्हणाला, ‘सब का नंबर आयेगा’. बिष्णोई टोळीकडून सलमान खानला लक्ष्य केले जात असतानाच आता अनिल पंडितच्या माध्यमातून सलमानच्या संपर्कातील कलाकारांना दहशतीच्या छायेत आणण्याचा नवा डाव आखला गेला आहे.
सात महिन्यांत ४ मोठे गुन्हे; पंडितचे नेटवर्क सक्रिय
गेल्या सात महिन्यांत उत्तर भारतात घडलेल्या अनेक गोळीबारांच्या घटनांचा धागा थेट अनिल पंडितशी जोडला गेला आहे:
फेब्रुवारी (दिल्ली) : बवाना औद्योगिक वसाहतीत एका व्यापाऱ्याची हत्या झाली. ‘रणदीप मलिक अनिल पंडित’ या हँडलवरून लॉरेन्स बिष्णोई, जितेंद्र गोगी, हाशिम बाबा व काला राणा गँगच्या वतीने ही हत्या केल्याचा दावा केला.
मार्च (पानिपत) : असंध रोडवरील ‘हास्त फॉरेक्स’ मनी एक्सचेंज कार्यालयावर दुचाकीस्वारांनी सात फेऱ्या झाडल्या. याची जबाबदारीही पंडितने स्वीकारली होती.
गायक व रॅपर्सना धमक्या : २०२४ च्या सुरुवातीला रॅपर बादशहाला धमकी देणे असो किंवा जून महिन्यात दिल्लीत प्रसिद्ध पंजाबी गायक गुरूल रंधावाच्या जिमबाहेर घडवून आणलेला गोळीबार असो, प्रत्येक घटनेत अनिल पंडितचेच नाव केंद्रस्थानी राहिले आहे. रणदीप मलिक, हॅरी बॉक्सर आणि हरमन संधू यांसारख्या गुंडांसोबत मिळून काम करणारा अनिल पंडित हा आता बिष्णोई गँगचा सर्वात घातक परदेशी चेहरा बनला असून केंद्रीय गुप्तचर यंत्रणा त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर तपास करत आहेत.